Published On : Fri, Dec 8th, 2017

२६ डिसेंबरला नागपूर ग्रामीण विभागातर्फे १०१ वी ‘विभागीय डाक अदालत’

Advertisement


नागपूर: भारतीय टपाल विभागा-अंतर्गत कार्यरत असलेल्‍या नागपुर ग्रामीण विभागातर्फे, विभागीय स्तरावर प्रवर अधीक्षक डाकघर, नागपुर ग्रामीण मंडळ, तिसरा माळा, नागपुर सिटी प्रधान डाकघर बिल्डिंग, इतवारी,नागपुर-४४०००२ यांच्‍या कार्यालयामध्ये १०१ वी विभागीय डाक अदालतचे २६ डिसेंबर २०१७, मंगळवार रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजन करण्यात आले आहे.

टपाल विभागाच्‍या कामासंबंधी, ज्या तक्रारीचे सहा आठवड्याच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल,स्पीड पोस्ट, डाक वस्तू, पार्सल, काउंटर सेवा, बचत बँक व मनी ऑर्डर याबाबत नागपुर ग्रामीण डाक विभागाच्या अंतर्गत असलेल्या डाकघराव्‍दारे-जसे नागपुर जिल्हा (नागपुर शहर व्यतिरिक्त), भंडारा व गोंदिया जिल्हयात उद्भवलेल्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीची एकच तक्रार विचारात घेतली जाईल.

तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. तक्रार केल्याची तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादीचा उल्लेख असावा. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार ‘श्री दे.आ.साळवे,प्रवर अधीक्षक डाकघर, नागपूर ग्रामीण मंडल, तिसरा माळा, नागपुर सिटी प्रधान डाकघर बिल्डिंग, इतवारी,नागपुर-४४०००२’’ यांच्या नावे अतिरिक्त प्रतीसह दिनांक २२ डिसेंबर २०१७ अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशाबेताने पाठवावी. तक्रारीच्या वरील भागावर स्वच्छ अक्षरात “१०१ वी डाक अदालत” असे लिहावे. त्यानंतर आलेल्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही.तक्रारकर्ता स्वतःच्या इच्छेने स्वखर्चाने या डाक अदालती मध्ये उपस्थित राहू शकतो, असे प्रवर अधीक्षक डाकघर, नागपुर ग्रामीण मंडळ यांच्या वतीने कळविण्‍यात आले आहे.