| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jan 22nd, 2021

  महापौरांच्या पुढाकाराने चर्मकार समाजाचे २०११ पासून प्रलंबित प्रकरण मार्गी

  महात्मा गांधी पुण्यतिथी दिनी ६३ चर्मकार बांधवांना मिळणार हक्काचे स्टॉल

  नागपूर : संत रविदास आश्रय योजने अंतर्गत महानगरपालिकेतर्फे चर्मकार बांधवांना व्यवसायाकरीता गठई स्टॉल्स देण्याबाबत २०११मध्ये योजना सुरू करण्यात आली. मात्र प्रशासकीय अडथळे आणि इतर बाबींमुळे मागील सुमारे १० वर्षापासून सदर प्रकरण प्रलंबितच राहिले. अखेर महापौर दयाशंकर तिवारी यांनी पुढाकार घेत प्रकरणातील संपूर्ण अडथळ्यांचा अभ्यास करून प्रकरण मार्गी लावले आहे. महापौरांच्या या पुढाकारातून आता ३० जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी पहिल्या टप्प्यात ६३ चर्मकार बांधवांना त्यांच्या हक्काचे स्टॉल्स मिळणार आहेत. महापौर पदाची जबाबदारी स्वीकारताच दयाशंकर तिवारी यांनी शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधत ते सोडविण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. त्याच अंतर्गत चर्मकार बांधवांच्या प्रलंबित प्रकरणालाही न्याय मिळाला असल्याने चर्मकार सेवा संघाद्वारे त्यांचे अभिनंदन करून पुष्पगुच्छ देउन त्यांचे स्वागत केले.

  संत रविदास आश्रय योजने अंतर्गत महानगरपालिकेतर्फे चर्मकार बांधवांना व्यवसायाकरीता देण्यात येणा-या गठई स्टॉल्सच्या प्रलंबित विषयासंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, प्रतोद दिव्या धुरडे, उपनेत्या वर्षा ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त मिलींद मेश्राम, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, सहायक आयुक्त सर्वश्री विजय हुमने, प्रकाश वराडे, गणेश राठोड, अशोक पाटील, हरीश राउत, सहायक आयुक्त किरण बगडे, सुषमा मांडगे, साधना पाटील, चर्मकार सेवा संघाचे अध्यक्ष भैयासाहेब बिघाने, कार्याध्यक्ष पंजाबराव सोनेकर, सहकोषाध्यक्ष विजय चवरे, गठई कामगार अध्यक्ष भाउराव तांडेकर, बंटी कोलते आदी उपस्थित होते.

  प्रारंभी महापौर दयाशंकर तिवारी नागपूर महानगरपालिकेतर्फे संत रविदास आश्रय योजने अंतर्गत चर्मकार बांधवांना व्यवसायाकरीता देण्यात येणा-या गठई स्टॉल्स योजनेबाबत स्थितीचा आढावा घेतला. चर्मकार सेवा संघाच्या प्रतिनिधींमार्फत सेवा संघाचे अध्यक्ष भैयासाहेब बिघाने यांनी अडचणी सांगितल्या व आपली भूमिका मांडली. उपायुक्त मिलींद मेश्राम यांनी योजनेच्या सद्यस्थितीची माहिती सादर केली. नागपूर महानगरपालिकेकडे एकूण १०६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ३५ अर्जदारांना वाहतूक विभागाने ना हरकरत प्रमाणपत्र दिले आहेत. याशिवाय अर्जदारांना मनपाकडे स्टॅम्प पेपर सादर करणे अनिवार्य असून आतापर्यंत १५ अर्जदारांनी स्टॅम्प पेपर सादर केले आहेत. ३९ प्रकरणे समाजविकास विभागाकडे पंजीयनकरीता पाठविण्यात आले होते त्यांची नोंदणी झाली असून आता या ३९ अर्जदारांना स्टॉल्स वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे. मनपाकडे प्राप्त अर्जाचे करण्यात आलेल्या सर्वेनुसार १२ लाभार्थी त्यांच्या दिलेल्या पत्त्यावर आढळले नाही तर ५ अर्जदारांचा मृत्यू झाल्याची माहिती उपायुक्त मिलींद मेश्राम यांनी सादर केली.

  केंद्रीकृत प्रक्रिया राबवा; स्वतंत्र कक्ष निर्माण करा
  मनपाकडे नोंदणी झालेल्या प्रत्येक चर्मकार बांधवांना गठई स्टॉल्स मिळणे आवश्यक आहे. मागील २०११ पासून सदर योजनेचे प्रकरण प्रलंबित असून ते ३० जानेवारीच्या आधी मार्गी लावण्याबाबत कार्यवाहीला वेग देण्यात यावा. यासाठी चर्मकार सेवा संघाच्या प्रतिनिधींशी समन्वय साधून कार्य करावे. शिवाय संपूर्ण कार्य वेगाने पूर्ण होउन चर्मकार बांधवांना लवकरात लवकर त्यांचे हक्काचे व्यवसायाकरीता स्टॉल्स मिळावे याकरिता केंद्रीकृत प्रक्रिया राबविण्यात यावी. यासाठी मनपा मुख्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

  स्वतंत्र कक्ष निर्माण करून त्याद्वारे योजनेची केंद्रीय प्रक्रिया राबविली जाईल. त्यामुळे संपूर्ण अर्ज मुख्यालयात जमा केले जातील. त्यांची छाननी केली जाईल. येणारे अडथळे लक्षात घेउन ते चर्मकार संघाच्या समन्वयाने दूर केले जातील व संबंधित झोनकडे अंतिम प्रक्रियेसाठी अर्ज पाठविण्यात येणार आहेत. संपूर्ण प्रकरण मार्गी लावण्यासाठी मनपा प्रशासन पूर्णत: सकारात्मक असून चर्मकार संघानेही समन्वयाच्या भूमिकेतून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145