Published On : Tue, Sep 24th, 2019

मनपाद्वारे शहरात १३४३० वैयक्तिक शौचालयाचे निर्माण

Advertisement

अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची माहिती : पुढील वाटचालीकरिता मनपाचे प्रयत्न

नागपूर : नागपूर महानगरपालिकेने नागपूर शहरात १३४३० वैयक्तिक शौचालयांचे निर्माण करीत हागणदारीमुक्त नागपूरच्या पुढील वाटचालीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शौचालय निर्माण करीत अनेक कुटुंबांना स्वच्छता अभियानाचे महत्त्व पटवून सांगितले आहे. आता महानगरपालिका ओडीएफ प्लस प्लसच्या मानांकनासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

नागपूर शहराला महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच हागणदारीमुक्त घोषित केले आहे. शहरात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरात वैयक्तिक शौचालय निर्माण करण्यासाठी २४ हजार २८४ अर्जप्राप्त करण्यात आले होते. त्याची छाननी झाल्यानंतर १३४३० पात्र लाभार्थ्यांना नागपूर महानगरपालिकेकडून वैयक्तिगत शौचालय निर्माण करण्यात आले आहे. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये २० सामूहिक शौचालयाचे नर्माण करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त शहरात ६८ सार्वजनिक शौचालयाचे निर्माण झाले असून पाच शौचालयाचे कार्य प्रगतीपथावर आहे. वदर्ळीच्या जागी हे शौचालये नर्माण करण्यात आले आहे. यामध्ये नेताजी मार्केट, बुधवार बाजार, गोकुळपेठ, भाजीमंडई, फुले बाजार, मेहाडिया चौक याठिकाणी सुलभ शौचालयाचे निर्माण करण्यात आले आहे. शहरात सार्वजनिक शौचालयाचे नियंत्रण हे सुलभ शौचालय प्रकल्पाअंतर्गत करण्यात आले आहे. सामूहिक शौचालयाची स्वच्छता ब्रिस्क या कंपनीकडे आहे.

शहर हागणदारीमुक्त शहराच्या पलीकडे जाण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेची वाटचाल करित आहे. या शौचालयाच्या निर्मितीमुळे गरीब कुटूंबांना दिलासा मिळाला आहे.

कचरा वर्गीकरण करूनच संकलित करावा
शहरातील कचरा ओला सुका कचरा वर्गीकरण करून नागरिकांनी द्यावा. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कचरा वर्गीकरण करून देण्यात यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले. ओला कचऱ्यापासून खत निर्मिती करणे सुरू आहे. सुका कचऱ्याची पुनर्प्रक्रिया करण्यात येणार आहे. म्हणून कचरा ओला सुका वर्गीकृत करून कचरा संकलन करण्यांकडे द्यावा, असे आवाहन आरोग्य अधिकारी (स्वच्छता)डॉ.सुनील कांबळे, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी केले आहे. कचऱ्याचे वर्गीकरण झाले तर, कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे ढीग वाढणार नाही. कचरा डेपोमध्ये कचरा साठल्याने मिथेन गॅस निर्माण तयार होतो आहे व कचऱ्याला आग लागते व धूर पसरतो यामुळे प्रदूषण वाढते. कचरा वर्गीकृत केल्याने कचऱ्याची लगेच विल्हेवाट लागेल व प्रदूषण वाढणार नाही.

स्वच्छता ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन
शहरातील स्वच्छतेसंदर्भात कुठलीही तक्रार करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता ॲप तयार केलेली आहे. या ॲप तक्रार केली तर १२ तासात तक्रार सोडविण्यात येईल. नागरिकांनी ही ॲप जास्तीत जास्त संख्येने डाऊनलोड करावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे. स्वच्छ मंच या पोर्टलवर आपले संस्थेच्या व वैयक्तिक पर्यावरणाशी संबंधित कार्य व त्याचे फोटो अपलोड करू शकता, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले.