महापौरांच्या ‘वंदे मातरम् जनआरोग्य योजनेला’ सर्वपक्षीय नगरसेवकांची साथ
७५ ‘हेल्थ पोस्ट’ संदर्भात आढावा बैठक
नागपूर: महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगर पालिकेद्वारे शहरात ७५ ‘हेल्थ पोस्टची’ निर्मिती करण्यात येत आहे. या संदर्भात सोमवारी (ता. १८) महापौर दयाशंकर तिवारी यांनी शहराच्या आऊटर भागातील सर्वपक्षीय नगरसेवकांची आढावा बैठक घेतली. बैठकीत सर्व नगरसेवकांनी महापौरांच्या ‘वंदे मातरम् जनआरोग्य योजनेला’ सकारात्मक प्रतिसाद दर्शवित साथ दिली. शहराच्या आऊटर भागातील सर्व नगरसेवकांनी ज्या प्रभागात लोकसंख्येनुसार आरोग्य यंत्रणा अपुरी आहे किंवा मुळीच नाही अशा भागांचे सर्वेक्षण करून हेल्थ पोस्ट तयार करण्यासाठी योग्य जागांची माहिती महापौरांना दिली.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्ता पक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, शिवसेना गटनेते किशोर कुमेरिया, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, माजी उपमहापौर मनीषा कोठे, विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, दुर्बल घटक समिती सभापती गोपीचंद कुमरे, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, लकडगंज झोन सभापती राजकुमार साहू, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, ज्येष्ठ नगरसेवक सर्वश्री सुनील अग्रवाल, प्रफुल्ल गुडधे, नगरसेवक सर्वश्री प्रदीप पोहाणे, भगवान मेंढे, शेषराव गोतमारे, विक्रम ग्वालबंशी, लहुकुमार बेहेते, संजय बुर्रेवार, नगरसेविका डॉ. परिणिता फुके, ॲड. मीनाक्षी तेलगोटे, पल्लवी शामकुळे, मंगला गवरे, विशाखा बांते, सोनाली कडू, भावना लोणारे, प्रमिला मंथरानी, लिला हाथीबेड, आशा उईके, जयश्री रारोकर, अर्चना पाठक, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, अतिरिक्त सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, टाटा ट्रस्ट चे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. टिकेश बिसेन आदी उपस्थित होते.
७५ ‘हेल्थ पोस्ट’ निर्मितीची संकल्पना महापौर दयाशंकर तिवारी यांच्या मनात मागील एक वर्षापासून होती. पदभार स्वीकारताच महापौर दयाशंकर तिवारी यांनी शहरात ७५ हेल्थ पोस्ट तयार करण्याची घोषणा केली होती. आता या कार्याला गती मिळाली असून महापौरांनी यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून स्वत: पाठपुरावा घेत आहेत. आज झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवकांना दोन दिवसात संबंधित जागेसंदर्भात पत्र मागविले आहेत.
‘हेल्थ पोस्ट’मध्ये रुग्णांची तपासणी व औषधोपचार (ओपीडी) केले जाईल. रुग्णाला गरज पडल्यास जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविण्याची व्यवस्था संबंधित ‘हेल्थ पोस्ट’मध्ये असेल. ७५ ‘हेल्थ पोस्ट’ च्या निर्मितीसाठी मनपाला इमारत बांधकाम, वीज बिल आणि पाणी यासाठी येणारा खर्च करावयाचा आहे. उर्वरीत डॉक्टर, परिचारीका, औषधी यासाठी लागणारा संपूर्ण खर्च संबंधित सामाजिक संस्था करणार आहेत, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिली. या योजनेमागे कुठलाही राजकीय हेतू नसून योजनेला ‘वंदे मातरम् जनआरोग्य योजना’ असे नाव देण्यात आले आहे. शहरातील विविध भागात निर्माण होणा-या ‘हेल्थ पोस्ट’ना संबंधित भागातील शहीद जवानांची नावे देण्यात येणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.
हेल्थ पोस्टमध्ये डॉक्टर, परिचारिका, वीजबिल, औषध, रूग्णालयात लागणारे साहित्यांचा समावेश राहील. यातील जास्तीत जास्त खर्च सामाजिक संस्था करणार आहेत. तसेच शहरात मनपाचे दवाखाने सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध असल्यास मोफत अथवा कमी भाड्याने मनपाला देण्याचे आवाहन महापौरांनी नागरिकांना केले आहे. यासाठी मनपाची एक नियमावली तयार करण्याचे आदेशही संबंधित अधिका-यांना महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.
सर्वसामान्यांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण होतील : महापौर दयाशंकर तिवारी
शहरात राहणा-या तळागाळातील, वस्तीत राहणा-या गरीब व गरजू लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळण्याच्या हेतूने या ‘हेल्थ पोस्ट’ची निर्मिती करण्यात येत आहे. हेल्थ पोस्टच्या निर्मितीमुळे गरीब तसेच सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी संबंधित गरजा पूर्ण करता येईल. रुग्णाला योग्य वेळेत उपचार घेता येईल व उपचारासाठी लागणारा खर्च कमी होण्यास मदत होईल. तसेच वेगाने वाढणा-या शहरी लोकसंख्येच्या आरोग्याविषयक आव्हानांना सामोर जाण्यासाठी या हेल्थपोस्टची मोठी मदत होणार आहे, असे महापौर यावेळी म्हणाले.