Published On : Thu, Nov 23rd, 2017

मुख्याध्यापकांची कार्यशाळा : मनपा व आरटीई ॲक्शन कमिटीचे आयोजन

Advertisement


नागपूर: शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत अधिकार आहे. नागपूर शहरातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत प्राथमिक शिक्षण पोहचविण्यासाठी महानगरपालिका कटीबद्ध आहे, असा विश्वास उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी व्यक्त केला.

बुधवारी (ता.२२) कविवर्य सुरेश भट सभागृहात महानगरपालिका व आरटीई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शहरातील शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, माजी उपमहापौर व शिवसेना पक्ष नेते किशोर कुमेरिया, शिक्षण समिती उपसभापती स्नेहल बिहारे, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेविका शीतल कामडे, नागपूर महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, आरोग्य विभागाचे अधीक्षक मदन सुभेदार, जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी श्री. राऊत, आरटीई ॲक्शन कमिटीचे अध्यक्ष शाहीद शरीफ, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका जिनद सैय्यद प्रामुख्याने उपस्थित होत्या.

पुढे बोलताना दीपराज पार्डीकर म्हणाले, भारत सरकारच्या निर्देशानुसार सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शिक्षणाचा प्रसार सर्वत्र होत आहे. २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया व त्याबाबतीत पालकांना व शिक्षकांना वारंवार तक्रारी येतात. या कार्यशाळेच्या माध्यमातून त्या तक्रारींचे निवारण होईल यात शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी सूचना देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.


याप्रसंगी बोलताना क्रीडा समिती सभापती नागेश सहारे म्हणाले, अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन केल्याने शिक्षकांना व मुख्याध्यापकांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. गोरगरीबांना शिक्षण देण्यासाठी महानगरपालिका सक्षम आहे, असेही ते म्हणाले. माजी उपमहापौर व शिवसेना नेते किशोर कुमेरिया यांनी यावेळी कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे आभार मानले.

यावेळी अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाबद्दल माहिती सांगितली तसेच ‘स्वच्छता सर्वेक्षण-२०१८’ बाबत आवश्यक ती जनजागृती करण्याचे आवाहन केले.


प्रारंभी मान्यवरांचे स्वागत शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त डॉ.रंजना लाडे यांनी केले. आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संदर्भात तसेच शाळांना व पालकांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण होण्याकरीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत आरटीई ॲक्शन कमिटीचे अध्यक्ष मो.शाहीद शरीफ, महिला व बाल कल्याण अधिकारी विजयसिंग परदेशी, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका जिनद सैय्यद यांनी आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन केले व उपस्थितांच्या प्रश्नांचे निराकरण केले.