Published On : Wed, May 3rd, 2017

विश्वव्यापी शोषणकारी अर्थव्यवस्था ही जागतिक देणगी : पद्मश्री सुभाष पाळेकर

Advertisement

Zero Budget
नागपूर:
भारतात २००२ मध्ये लोकसभेत ‘जैवविविधता संरक्षण कायदा’ हा संमत झाला तेव्हापासून पिकांच्या देशी जाती, प्राणी, कीटक, वनस्पतीचे संरक्षण, लोकभाषा, उत्सव इत्यादीला राज्य असो किंवा केंद्र दोन्ही सरकारांना संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे आणि दोन्ही सरकार ते देतही असते. मात्र तरीही शेतकऱ्यांची समस्या जर खऱ्या अर्थाने कोणी निर्माण केली असेल तर ती व्यवस्थेने केली आहे. यालाच विश्वव्यापी शोषणकारी अर्थव्यवस्था म्हणतात, असे वक्तव्य नैसर्गिक शेतीचे प्रणेते पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी केले.

पं.वसंतराव देशपांडे सभागृहात बुधवारी नागपूर नॅचरलतर्फे ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ या तीन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर महापौर नंदा जिचकार, राज्यसभेचे माजी सदस्य अविनाश पांडे, माजी आमदार मुजफ्फर हुसैन उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना सुभाष पाळेकर यांनी रासायनिक शेती, सेंद्रीय शेतीचे दुष्परिणाम, शेतकाऱ्यांना आत्महत्या करण्यास बाध्य करणाऱ्या बँका, अडीच पट धान्य वाढीचे ज्ञान उपलब्ध असतानाही एक टक्काही दर एकरी उत्पादनवाढीचे तंत्रज्ञान न शिकविणाऱ्या व सरकारच्या पैशांवर पोसल्या जाणाऱ्या व पांढरा हत्ती ठरलेल्या भारतातील कृषी विद्यापीठे, सहकारी तत्त्वावर चालणारी लुटारु व्यवस्था इत्यादी बाबींवर विस्तृत भाष्य केले. रासायनिक शेती ही जगाला कर्करोग, हृदयरोग व मधुमेहासारखे रोगही देत असल्याचे वास्तव त्यांनी मांडले. झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये देशी बियाणे हे रासायनिक बियाणांपेक्षा अडीच पट उत्पन्न कशाप्रकारे जास्त देते याचे अभ्यासपूर्ण वर्णन त्यांनी सादर करुन सभागृहाला थक्क केले.

२०६२ साली देशात अन्नधान्याचा प्रश्न हा गंभीर होणार असून खाद्य सुरक्षेचा प्रश्न सोडविण्याची क्षमता फक्त नैसर्गिक शेतीमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक तापामानात वाढ करणाऱ्या रासयनिक शेतीपेक्षाही सेंद्रीय शेती ही कशाप्रकारे जास्त घातक, खतरनाक,विषारी आणि शोषणकर्ती आहे हे सोदाहरण त्यांनी स्पष्ट केले. भारतातील अविकसित राज्यापेक्षा विकसित राज्यांमध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण का जास्त आहेत याची विविध कारणे त्यांनी विषद केली. सिंचन सोयी नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो हा मुद्दा त्यांनी खोडून काढत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या जागतिक बाजारीकरणाची देणगी असल्याचे सांगितले. जागतिक अर्थव्यवस्थेला बांधील असल्यामुळे लाखो टन तूर डाळ, गहू, सोयाबीन तेल, यूरिया, खते इत्यादी वस्तू मागील ६० वर्षांपासून भारत सरकार सातत्याने आयात करीत आहे. यामुळेच कृषीच्या बाबतील भारत अद्याप स्वावलंबी देश होऊ शकला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. झिरो बजेट नैसर्गिक शेतीद्वारे दरवर्षी एकरी बारा लाखांपर्यंतचे उत्पन्न शेतकऱ्याला कसे मिळू शकते याविषयी कार्यशाळेत ते मार्गदर्शन करणार आहेत.

महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नैसर्गिक शेती हे वरदान आहे. सुभाष पाळेकर यांच्या रूपाने ते शेतकऱ्यांना मिळाले आहे. त्यांनी आजपर्यंत देशभरात दिलेले ज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करून आर्थिक समृद्धीकडे वाटचाल सुरू केली आहे. तीन दिवसांच्या या कार्यशाळेतून नैसर्गिक शेतीविषयीचे नवे प्रयोग राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांना शिकायला मिळणार आहे. ते ग्रहण करीत ही चळवळ देशव्यापी करा, असे आवाहन त्यांनी केले.

राजकुमार तिरपुडे म्हणाले, आपण स्वत: नैसर्गिक शेतीची कास धरली आहे. या शेतीतून जो फायदा आहे तो शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणारा आहे. माजी आमदार मुजफ्फर हुसैन म्हणाले, सुभाष पाळेकर यांच्या प्रत्येक शिबिराची माहिती आपण घेत होतो. खास मुंबईहून या शिबिरासाठी आल्याचा उल्लेख त्यांनी केला.

माजी खासदार अविनाश पांडे यांनीही नैसर्गिक शेती चळवळीची स्तुती करीत शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीची कास धरण्याचे आवाहन केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. रचना खांडेकर हिने गणेश वंदना सादर केली. बाल कलावंतांनी गणेश नृत्य सादर केले. प्रास्ताविक हेमंतसिंह चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन आनंद आंबेकर यांनी केले. आभार वीरेंद्र बरबटे यांनी केले.

तीन दिवसीय कार्यशाळेत सुभाष पाळेकर हे खाद्य सुरक्षा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जागतिक तापमान, ग्रामीण तरुणाईचे स्थलांतरण, रासायनिक शेतीमुळे होणारे जीवघेणे घातक रोग, झपाट्याने विभक्त होणारी कुटुंबव्यवस्था, वेगाने नष्ट होणारी जैवविविधता, बाजार नियंत्रण व्यवस्था इत्यादी विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. शुक्रवार दिनांक ५ एप्रिल रोजी शिबिराची सांगता होईल.