नागपूर : मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्य सरकारविरोधात मोर्चा व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर करणार असून, कार्यक्रम २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत संविधान चौकाजवळील मोकळ्या जागेत होणार आहे.
या आंदोलनात १५०० ते २००० कार्यप्रशिक्षणार्थी लाडके भाऊ सहभागी होणार असून, सरकारने कार्यप्रशिक्षणार्थ्यांची झालेली फसवणूक याविरोधात निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.
पोलिसांची अट
नागपूर पोलीस आयुक्तालयाने यासाठी परवानगी दिली असली तरी कलम ३७ (१) (३) मपोका अधिनियम १९५१ अंतर्गत घालण्यात आलेल्या अटींचे काटेकोर पालन आयोजकांना बंधनकारक केले आहे.
आंदोलनादरम्यान गैरकायदेशीर कृती, पुतळ्याची जाळपोळ, प्रतिजाळण होणार नाही.
वाहतुकीस अडथळा, चेंगराचेंगरी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळले जाईल.
प्रक्षोभक घोषणाबाजी, जाती-धर्मीयांच्या भावना दुखावतील असे लिखाण वा फलक वापरले जाणार नाहीत.
कार्यक्रमात कुठलीही जिवीतहानी किंवा नुकसान झाल्यास त्याची भरपाई आयोजकांकडून वसूल केली जाईल.
ध्वनीप्रदूषण नियमांचे पालन केले जाईल आणि डीजे साऊंडचा वापर बंदीस्त असेल.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांवर राहील आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल.