Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Feb 14th, 2020

  युवकांनी आपल्या कौशल्याच्या आधारे उद्यमशीलतेचा विकास करावा

  युथ एम्पावरमेंट समिट या रोजगार मेळाव्याचे नागपूरात उद्घाटन

  नागपूर: युवकांनी आपल्या कौशल्याच्या आधारे उद्यमशीलतेचा विकास करावा. आपल्या देशामध्ये वित्तीय व्यवस्थापन, कार्मिक व्यवस्थापन याच बरोबर उद्यमशीलता व्यवस्थापन सुद्धा महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केले. फॉर्च्यून फाउंडेशन, सुक्ष्म लघु व मध्यम विकास संस्था, इंजिनिअरींग कॉलेजप्लेसमेंट असोसिएशन आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या युथ एम्पावरमेंट समिट या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन स्थानिक आमदार निवास येथे झाले, त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. फॉर्च्यून फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार प्रा. अनिल सोले, नागपूरचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी सुद्‌धा यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

  नागपुरातील मिहान प्रकल्पामध्ये आतापर्यंत 33 हजार युवकांना रोजगार उपलब्ध झाला असून मदर डेअरी सारख्या प्रकल्पामधून स्वयंरोजगार मिळत असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. रोजगाराच्या संदर्भातील मार्गदर्शन व रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या सोबत समन्वय संवाद आणि सहकार्य या युवा समिटद्वारे होत आहे. मागील वर्षी याच समिटद्वारे 6 हजार तरुणांना रोजगार मिळाले असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. रोजगार मागणाऱ्यापेक्षा रोजगार देणारे बना, असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी युवकांना केले.

  राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत वित्तीय तसेच हॉस्पिटॅलिटी या सेवा क्षेत्रामध्ये अमाप संधी उपलब्ध असून तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या युवकांना रोजगाराच्या पुष्कळ संधी उपलब्ध आहे ,असे नमूद केले. उद्योगांना रोजगारक्षम युवा मिळत नाही तर युवकांना अपक्षेप्रमाणे रोजगार मिळत नाही अशा दोन्ही घटकांना या युवा समिट परिषदेच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा एक चांगला प्रयत्न होत आहे असे त्यांनी सांगितले. विदर्भामध्ये सुक्ष्म लघु व मध्यम उद्योगाच्या उपलब्ध होत असून युवकांनी त्यांचा सुद्धा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

  फॉर्च्यून फाउंडेशनचे अध्यक्ष व या परिषदेचे संयोजक प्रा. अनिल सोले यांनी यंदाच्या युथ एम्पावरमेंट समिटमध्ये 60 च्यावर कंपन्या आल्या असून त्यात 4800 जणांची भरती करणार आहेत . आमदार निवासच्या 100 खोल्यांमध्ये या भरतीसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत व यासाठी मनुष्यबळ व्यवस्थापक सुद्धा येथे दाखल झाले आहेत. मागच्या वर्षी 5 हजाराच्या वर युवकांची निवड झाली होती. या समिटसाठी कुठलेही शुल्क नसून 25 हजाराच्या वर युवकांनी संकेतस्थळावर नोंदणी केली आहे या सर्वांच्या मुलाखती या समिट दरम्यान होतील. असे त्यांनी सांगितले.

  14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान आमदार निवास सिव्हिल लाइन्स येथे आयोजित या समिटमध्ये उद्यमशील युवावर्गासाठी कर्तृत्ववान मान्यवरांचे प्रेरक मार्गदर्शन परिसंवाद, सरकारी महामंडळ आणि शासकीय योजनांचे 40 पेक्षा जास्त माहिती दालने, विविध प्रकारच्या उद्योगासाठी लागणा-या यंत्रांची प्रात्यक्षिके , बँकाचे मार्गदर्शन चित्रफ़िती आणि प्रदर्शनाचा समावेश असणार आहे.

  या समिटच्या उद्‌घाटकीय सत्रात फॉर्च्यून फाउंडेशनचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व विदर्भ व राज्यातील इतर भागातून आलेले युवक उपस्थित होते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145