Published On : Fri, Feb 14th, 2020

कर्मचारी मारहाणीची महावितरणकडून गंभीर दखल

कर्मचाऱ्यांना अधिक संरक्षण, कठोर कारवाईसाठी उपाययोजना

Mahavitaran Logo Marathi

नागपूर,: वीज बिलांच्या थकबाकी वसुलीसाठी ग्राहकांना विनंती करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण होण्याच्या घटना वाढत असून अशा प्रकरणात महावितरण प्रशासन कर्मचारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर उपाययोजना करणार आहे.

Advertisement

थकीत वीज देयकाच्या वसुलीसाठी प्रकाशनगर येथे गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना गुरुवारी दि.13 फेब्रुवारीला दुपारी घडली. महावितरणचे स्थानिक वरिष्ठ प्रशासन आणि कर्मचारी संघटनेच्या दबावामुळे या प्रकरणात राकेश भारती व दयानंद निर्मलकर या दोन्ही आरोपी विरुद्ध पोलिसांनी भादवि 332, 353, 504 ,34 अन्वये गुन्हा दाखल केला होता.

या घटनेची गंभीरपणे दखल घेत महावितरणचे प्रादेशिक संचालक (प्रभारी) दिलीप घुगल यांनी आज विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. अशा प्रकरणात आरोपींवर त्वरित व कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्त यांच्याकडे करण्यात येणार असून थकीत वीज बिलांच्या वसुली पथकासोबत अधिक पोलीस बंदोबस्त देण्याचे नियोजन करण्यात येइल, अशी माहिती दिलीप घुगल यांनी यावेळी दिली. यापूर्वी घडलेल्या मारहाण प्रकरणांतील सध्यस्थितीचीची माहिती मागवून आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी महावितरणच्या संबंधित विभागाला दिले.

मारहाणीच्या घटना प्रामुख्याने यापूर्वी एसएनडीएल फ्रँचाइजी असलेल्या विभागातच घडत असून या भागातील ग्राहकांच्या वीज देयकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचेही निर्देश त्यांनी दिले. या बैठकीच्या वेळी अधीक्षक अभियंता दिलीप दोडके,उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे तसेच विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी रवी वैद्य,विनायक मानमोडे, राजेश पोफळी, पी. व्यंकटेश नायडू, सी. एम. मौर्य, सादिक अब्दुल, महेश ठाकूर,लक्ष्मण वैरागडे इत्यादी प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

वीज बिलांची मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या भागांतील ग्राहकांनी वीज बिलांचा नियमित भरणा करून महावितरणला सहकार्य करावे,असे आवाहन महावितरणने केले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement