Published On : Sat, Oct 7th, 2017

युवा उद्योजक व कारागिरांना मुद्रा योजनेचा सूलभपणे लाभ द्या – हंसराज अहीर

Advertisement

नागपूर: युवकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासोबतच छोट्या उद्योगांच्या विस्तारासाठी मुद्रा योजनेचा माध्यमातून सूलभपणे कर्ज पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी मुद्रा योजनेतील संकलपना प्रभावीपणे राबविण्यात येत असून बँकांनीही मुद्रा योजनेच्या माध्यमातून युवा उद्योजक व कारागिरांना सूलभपणे कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात मुद्रा प्रोत्साहन अभियानाचा शुभारंभ केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याहस्ते झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राज्यस्तरीय बँकर समिती महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यामाने तसेच निती आयोगाच्या मार्गदर्शनानुसार प्रोत्साहन अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर खासदार अजय संचेती, कृपाल तुमाने, महापौर नंदाताई जिचकार, आमदार गिरीश व्यास, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता उपस्थित होते.

शेतीला सिंचनासाठी पाणी तसेच युवकांच्या हाताला रोजगार देण्यासाठी शासनाचा प्राधान्यक्रम असल्याचे सांगतांना केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले की, जनधन योजनेसोबतच बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजनेसारखी महत्वकांक्षी योजना संपूर्ण देशात प्रभावीपणे राबविली असून या योजनेमध्ये सर्व बँकांनी सक्रिय सहभाग देण्याची आवश्यकता आहे. जनधन योजनेमध्ये 30 कोटी नवीन बँक खाते उघडण्यात आले असून या योजनेचा लाभ या माध्यमातून मिळणे सूलभ झाले आहे. मेकींग इंडीया व स्कील इंडियाच्या माध्यमातून स्वत:चा उद्योग सुरु करावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

शेतीसोबत दूधउत्पादनासह पूरक उद्योग सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येवून मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज घेवून आर्थिक विकास साधल्यास शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येणार नाही. ग्रामीण भागातील लहान उद्योगासोबतच कारागिरांनीही मुद्रा योजनेच्या माध्यमातून विविध वस्तूंचे उत्पादन केल्यास बाजारपेठेत वस्तुंची आयात करावी लागणार नाही. सर्व बँकांच्या झोनल अधिकाऱ्यांनी मुद्रा योजनेला प्राधान्य द्यावे व शासनाच्या या महत्वकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

प्रत्येक तालुक्यात मुद्रा प्रोत्साहन मेळावा
मुद्रा योजनेचा माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना रोजगारासोबतच स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याला प्राधान्य देण्यासाठी तालुका पातळीवर मुद्रा प्रोत्साहन मेळावा आयोजित करण्याच्या सूचना करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, या मेळाव्याच्या माध्यमातून बँकेच्या अधिकाऱ्यांनी मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज पुरवठासाठी युवकांना मार्गदर्शन करावे.

मुद्रा योजनेला राज्यात तीन वर्षापासून चांगला प्रतिसाद मिळत असून नागपूर जिल्हयात सर्वाधिक बेरोजगार युवक तसेच उद्योजकांना मुद्रा योजनेचा लाभ मिळाल्यामुळे विविध उद्योग सुरु करण्याला प्रोत्साहन मिळाले आहे. बेरोजगार युवकांनी ज्या उद्योगासाठी कर्ज घेतले आहे त्यासाठीच मिळालेले कर्ज खर्च करावे आणि उद्योग यशस्वी करताना कर्जाची परतफेडसुध्दा नियमित करावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

प्रारंभी बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता यांनी स्वागत करुन निती आयोग तसेच केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सूचनेनुसार देशात पन्नास मुद्रा प्रोत्साहन अभियान राबविण्यात येत असून राज्यात तीन मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. नागपूरपासून या अभियानाचा शुभारंभ होत असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले की, युवकांना नोकरीच्या मागे न जाता स्वत:चा उद्योग सुरु करावा. यासाठी बँकेतर्फे कर्ज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. बँकांकडे प्रलंबित असलेले सर्व मुद्रा योजनेचे अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. या मेळाव्यात सर्व राष्ट्रीयकृत बँका, आधार, नाबार्ड, आदी सहभागी झाल्या असून मुद्रा योजनेचा लाभासाठी मार्गदर्शन करणार आहे.

मागील आर्थिक वर्षात 1 लक्ष 37 हजार कोटीचे तर यावर्षात 1 लक्ष 80 हजार कोटीचे मुद्रा कर्ज मंजूर झाले आहे. मुद्रा प्रोत्साहन अभियानाचा केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दीपप्रज्वलीत करुन उद्घाटन केल्यानंतर डिजीटल बँकींगच्या आधारे हितेश सातवे या ग्राहकांनी वस्तुंच्या खरेदींच्या प्रात्याक्षिक तसेच मुद्रा योजनेअंतर्गत प्रशांत विनायक हाडके, शंभर उमरेडकर, श्रीधर उबले, राजकुमार जगणे, प्रविण कांबळे यांना कर्ज मंजूरीचे पत्र देण्यात आले. यावेळी भीम ॲपचे प्रात्याक्षिक दाखविल्यानंतर मुद्रा योजनेअंतर्गत यशस्वी लाभार्थांच्या यशोगाथा असलेल्या पुस्तकांचे प्रकाशित करण्यात आले. 27 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत देशभरात मुद्रा प्रोत्साहन अभियानाचे आयोजन करण्यात आले असून विविध बँकांचे स्टाल व या योजनेची माहिती देण्यात येणार आहेत. यावेळी विविध बँकांनी दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात स्टॉलची उभारणी केली आहे.

मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेतलेले यशस्वी लाभार्थी प्रदीप मेश्राम व निशिगंधा राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन शुभांगी रायले यांनी तर अभार प्रदर्शन लिड बँक व्यवस्थापक अयुब खान यांनी मानले.