Published On : Sat, Oct 7th, 2017

हुनर खोज संवाद यात्रेच्या माध्यमातून कारागिरांच्या दुर्मिळ कलाकृतींचे दर्शन

भारतीय कारागिरांच्या कुशल कलाकुसरीच्या माध्यमातून साकारलेल्या विविध राज्यातील कलाकृतींचा संगम हुनर खोज यात्रा संवाद तसेच सादरीकरणाच्या माध्यमातून डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाच्या परिसरात आयोजित करण्यात आला आहे. भारतीय पारंपारिक कलाअविष्कारांची मेजवाणी या सादरीकरणाच्या माध्यमातून अनुभवयाला मिळत आहे. देशातील 18 राज्यातील कारागिरांनी आपल्या पारंपारिक कलांचे प्रदर्शन येथे आयोजित केले आहे.
राष्ट्रीय कारागीर पंचायतद्वारे आयोजित करण्यात आलेल्या हुनर खोज यात्रेच्या माध्यमातून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचा उद्या दिनांक 8 ऑक्टोबर रोजी समारोप होत आहे.

भारतामधील अत्यंत प्राचीन अशा कला आज लुप्त होत असताना कारागिरांच्या माध्यमातून अशा कलांना प्रोत्साहन देण्यासोबतच या कलांना बाजारपेठ मिळवून देणे आणि कलाकारांना त्यांनी निर्मित केलेल्या कलेला योग्य मोबदला मिळावा यासाठी अशाप्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. भारतातील पारंपारिक संवर्धनासाठी कार्य करत असलेली बंगलुरु येथील हंडरेड हॅण्डस् या संस्थेने देशभरातील शंभर विविध कलावंतांच्या कलेपैकी 20 राज्यातील कलावंतांना हुनर खोजमध्ये आणुन त्यांच्या कलेचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या संस्थेच्या प्रमुख माला धवन यांनी पारंपारिक कला जोपासणाऱ्या कलावंताचा शोध घेवून त्यांच्या कलेंना व्यासपीठ मिळवून दिले आहे. ग्रामीण कारागिरांच्या तिसऱ्या आणि चौथ्या पीडीतील कारागिरांना पारंपारिक कलेसोबत त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे ब्रँडींग करुन आर्टीस्ट ते थेट ग्राहक या माध्यमातून कारागिरांना प्रोत्साहन देण्याचा प्रत्यन देशभर सुरु केला आहे.

हंडरेड हॅण्डस् या कारागिरांच्या समुहापैकी 20 कारागीर येथील कला संगमात सहभागी झाले असून गुजरात, राजस्थान, बिहार, कर्नाटक, हरियाणा, आंध्रप्रदेश, दिल्ली आदी राज्यातील 86 कारागिरांना तयार केलेल्या कलाकृती येथे सादर केल्या आहेत. परंपरागत वस्तुबाबत ग्राहकांनाही कारागिरांसोबत थेट संवाद साधून त्यांच्या कलाकुसरीची माहिती घेण्यासोबतच कारागिरांनी निर्मित केलेल्या कलाकृती थेट खरेदी करणे सूलभ झाले आहे. या समृहाचा सदस्य होताना कारागीर हा पारंपारिक कलानिर्मिती करणारा असल्यामुळे त्यांनी साकारलेल्या कलाकृती उच्च दर्जाच्या असून ग्राहकांना या कलाकृती अधिक चांगल्या कशा उपलब्ध करुन देता येईल याकडेही विशेष भर असल्याचे या संस्थेच्या प्रमुख माला धवन यांनी सांगितले.

हुनर खोज यात्रेत 18 राज्यातील कारागीर सहभागी झाले असून प्रात्याक्षिकाच्या माध्यमातून आपल्या कला प्रत्यक्ष साकारत आहे. यामध्ये ढोकरा कला (बेलमेटल) या कलेला चांगली मागणी असल्यामुळे व पितळेपासून तयार होत असल्याने या कलेला प्रोत्साहन मिळत आहे. तेलगांना, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यातील कारागीर पारंपारिक पध्दतीने ढोकरा कला साकारत आहे. या कलेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे संवर्धन करण्याला प्रोत्साहन मिळत आहे. मेटक्राप्ट ते बारडोली, बस्तर, उडिसा, तेलगांना, आंध्रप्रदेश या राज्यातील कारागीर अत्यंत आकर्षक पध्दतीने तयार करतात.

दूर्मिळ कलाकृतीच्या निर्मितीचे प्रात्याक्षिक
हुनर खोज यात्रेच्या माध्यमातून भारतीय दूर्मिळ कलाकृतींच्या निर्मितींची प्रात्याक्षिक उद्या दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजतापासून प्रत्यक्ष बघता येणार आहे. यामध्ये लोह (लोखंड) गाळण्यापासून ते विविध दूर्मिळ कलाकृर्ती विविध राज्यातून आलेले कारागीर तयार करणार आहे. त्यासोबतच मातीपासून विविध वस्तूंची निर्मिती, कापडापासून हस्तकला, विणकला, बुनकरी, बांबूपासून विविध वस्तू तयार करणे आदी प्रात्याक्षिक आयोजित करण्यात आले आहे. भारतीय दूर्मिळ कलाकृती तसेच कारागिरांना वस्तू तयारकरण्यासाठी प्रोत्साहन हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. भारतीय दूर्मिळ कलाकृतीच्या निर्मितीची प्रक्रिया डॉ. बसंतराव देशपांडे सभागृहाच्या परिसरात सर्वांना या माध्यमातून बघता येणार आहे.

मातीपासून तयार झालेल्या विविध वस्तू हे या यात्रेचे आकर्षण आहे. विदर्भ, मध्यप्रदेश छत्तीसगड येथील कारागीर या व्यवसायामध्ये आहेत. लाकडापासून विविध कलाकुसरीच्या वस्तू तयारकरण्यासाठी मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, महाराष्ट्र आदी राज्यातील कलावंतांनी सहभाग घेतला आहे. यासोबत कोसा, कोसा-सिल्क, हातमाग, विविध घरगुती वापराच्या वस्तू, मेळघाटातील बांबूपासून तयार केलेल्या विविध वस्तू, मातीच्या चुलींचा आधुनिक पध्दतीने वापर, चामड्याच्या विविध वस्तू, जंगलातील आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या औषधी वनस्पती, हस्तकला, आदी हुनर एक खोज या ग्रामीण भारतातील कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृतींचे अनोखे दर्शन पाहिला मिळते. या प्रदर्शनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय कारागिर पंचायतीचे प्रमुख सुनील देशपांडे, डॉ. महेश शर्मा, संयोजक डॉ. दिलीप पेशवे, वैभव काळे आदींनी केले आहे.