
नागपूर : राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ नागपूर शहर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री रस्त्यावर उतरून आंदोलन केले. गणेशपेठ परिसरातील भाजप कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थही घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरक्षा व्यवस्था वाढवली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, दिल्लीत INDIA आघाडीकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील काही नेत्यांना ताब्यात घेतले होते.
या कारवाईच्या निषेधार्थ नागपूर शहर युवक काँग्रेसने गणेशपेठ येथील भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन केले. विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या लोकशाही मार्गावरील आंदोलनांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर नागपुरातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले.



