
नागपूर : पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नऊ वर्षीय मुलीशी अश्लील कृत्य आणि छेडछाड केल्याच्या आरोपातील व्यक्तीला संतप्त जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नारायणदास वैष्णव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर पारडी पोलिसांनी मारहाणीत सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारडी परिसरात राहणारी नऊ वर्षीय मुलगी घराजवळ खेळण्यासाठी गेली होती. यावेळी शेजारी राहणाऱ्या नारायणदास वैष्णव याने तिला जबरदस्तीने आपल्या घरी नेऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, सोमवारी रात्री परिसरातील काही नागरिकांनी नारायणदासला रस्त्यावर पकडले आणि त्याच्यावर हल्ला केला. जमावाच्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला जमावाच्या तावडीतून बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास उपचारादरम्यान नारायणदासचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी मारहाणीत सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू केले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. प्रकरणाचा पुढील तपास पारडी पोलीस करीत आहेत.
नागपुरात जमावाच्या मारहाणीनंतर मृत्यूची दुसरी घटना-
नागपुरात अलीकडच्या काळात जमावाच्या मारहाणीनंतर मृत्यूची ही दुसरी घटना ठरली आहे. काही दिवसांपूर्वी बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॉडेल मिल कॉलनी येथे चोरीचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून स्थानिकांनी एका व्यक्तीला पकडून मारहाण केली होती. त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.



