
नागपूर : गोवंश तस्करीच्या प्रकरणांमध्ये पोलिसांच्या रडारवर असलेला आणि मकोका अंतर्गत दाखल गुन्ह्यात जामीन रद्द झाल्यानंतर फरार झालेला वसीम ऊर्फ शिबू अहमद समसुद्दीन अहमद अखेर पोलिसांच्या हाती लागला. यशोधरानगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पांडे बस्ती परिसरात सापळा रचून त्याला अटक केली.
वसीमविरुद्ध गोवंश तस्करीशी संबंधित गुन्हे दाखल असून, मकोका अंतर्गत दाखल गंभीर प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात जामीन रद्द झाल्यानंतर तो पोलिसांना चकवा देत फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते.
दरम्यान, रात्री गस्तीवर असताना यशोधरानगर पोलिसांच्या तपास पथकाला वसीम हा पांडे बस्तीहून मेट्रो स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावरील एका कंपाउंडजवळ असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी परिसरात सापळा रचून वसीमला ताब्यात घेतले. ओळख पटवल्यानंतर त्याला यशोधरानगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली.
गोवंश तस्करीच्या प्रकरणातील आरोपी तसेच मकोका प्रकरणात जामीन रद्द झाल्यानंतर फरार असलेल्या वसीमला अटक करण्यात यशोधरानगर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे फरार आरोपींवर पोलिसांची नजर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.



