Published On : Wed, Oct 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरमध्ये गरबा कार्यक्रमातील वादातून तरुणावर चाकूहल्ला; दोघांना अटक

मनीषनगरातील घटनेने खळबळ; अथर्व वाडीभस्मे गंभीर जखमी, अन्य दोघांचा शोध सुरू
Advertisement

Nagpur Garba Dispute Turns Violent: Youth Stabbed, Two Arrested

नागपूर : गरबा कार्यक्रमातून बाहेर काढल्याच्या रागातून झालेल्या वादाचे पर्यवसान चाकूहल्ल्यात झाल्याची घटना नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मनीषनगर परिसरातील रुद्र बारजवळ असलेल्या सुरेश ग्राउंड येथे १९ ऑक्टोबरच्या रात्री हा प्रकार घडला. या हल्ल्यात अथर्व वाडीभस्मे हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मेडिकल रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अजनी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अन्य दोन संशयितांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबरच्या रात्री सुरेश ग्राउंड येथे गरबा कार्यक्रम सुरू होता. यावेळी काही तरुण मद्यधुंद अवस्थेत कार्यक्रमस्थळी येऊन शिवीगाळ करत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे तेथील बाऊन्सरच्या मदतीने त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले. याच कारणावरून तक्रारदार कृष्णा बराडिया आणि संबंधित तरुणांमध्ये वाद झाला. त्यानंतर ते तेथून निघून गेले.

मात्र, हा वाद तिथेच थांबला नाही. मुख्य आरोपी तेजस ढेंगे याने तक्रारदाराला फोन करून त्याचा मित्र अथर्व वाडीभस्मे याच्यासह घटनास्थळी बोलावल्याचा आरोप आहे. त्यानंतर गरबा कार्यक्रमातून बाहेर काढण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा वाद उफाळला. याचदरम्यान अथर्ववर चाकूने हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याच्या छातीवर दोन ते तीन वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला.

जखमी अथर्वला सुरुवातीला तायवाडे रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्याला मेडिकल रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये हलविण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Advertisement

या प्रकरणी अजनी पोलिसांनी तेजस ढेंगे आणि अल्ताफ आलम अन्सारी यांना अटक केली आहे. अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू असून, पोलिसांनी हत्येचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अजनी पोलीस करीत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.