Published On : Wed, Oct 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

दीक्षाभूमीवर गर्दीत हरवलेल्या ८० बालकांचा शोध; चाइल्ड हेल्पलाइनच्या प्रयत्नांनी पालकांना दिलासा

Advertisement

दीक्षाभूमीवर गर्दीत हरवलेल्या ८० बालकांचा शोध; चाइल्ड हेल्पलाइनच्या प्रयत्नांनी पालकांना दिलासा

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर जमलेल्या अनुयायांच्या गर्दीत पालकांपासून ताटातूट झालेल्या ८० बालकांना शोधून त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप सोपविण्यात आले. बजाजनगर पोलिस आणि चाइल्ड हेल्पलाइनने समन्वयाने राबविलेल्या या मोहिमेमुळे गर्दीत भरकटलेल्या चिमुकल्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर दरवर्षी देशभरातून अनुयायी मोठ्या संख्येने येतात. यंदाही परिसरात मोठी गर्दी झाल्याने लहान मुले पालकांपासून दूर जाण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन बालकांची ओळख पटविण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत पालकांशी त्वरित संपर्क साधण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

या उपक्रमांतर्गत बालकांच्या मनगटावर ओळखपत्राचे बँड बांधण्यात आले. त्यावर पालकांचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि जवळच्या मदत केंद्राची माहिती देण्यात आली. त्यामुळे गर्दीत एखादे बालक हरवल्यास त्याची ओळख निश्चित करून कुटुंबीयांशी संपर्क साधण्यास मदत झाली. चाइल्ड हेल्पलाइनच्या स्वयंसेवकांनी परिसरात फिरून पालकांना या सुविधेची माहिती दिली, तसेच बालकांच्या सुरक्षेबाबत आवश्यक मार्गदर्शन केले.

या मोहिमेदरम्यान गर्दीत हरवलेल्या ८० बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. धार्मिक सोहळ्यादरम्यान बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस, प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी केलेल्या समन्वित प्रयत्नांचे या उपक्रमातून महत्त्व अधोरेखित झाले.

Advertisement

बालकल्याण समितीच्या अध्यक्षा छाया राऊत, पोलीस निरीक्षक सी. बी. चव्हाण, बजाजनगर पोलीस ठाण्याच्या जयश्री गिरे यांच्यासह चाइल्ड हेल्पलाइनच्या स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. महिला व बालविकास कार्यालयाचे सुनील मिसरे, बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, शिक्षण विभागाचे प्रसन्नजीत गायकवाड तसेच चाइल्ड हेल्पलाइनचे प्रतिनिधी आणि मातृसेवा संघ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही जनजागृतीसाठी सहकार्य केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.