Published On : Fri, Feb 22nd, 2019

युवा कलाकारांची रंगली जुगलबंदी -नादब्रह्म संगीत समारोह

Advertisement

नागपुर : नादब्रह्म प्रस्तुत स्व. डा. उल्हास दत्तात्रय बोधनकर स्मृती संगीत समारोहाचे बुधवारी सायंटिफिक सभागृहात आयोजन करण्यात आले होते. विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या सौजन्याने आयोजित या कार्यक्रमाला संगीतकार शैलेश दाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. नादब्रह्मचे अध्यक्ष महेश वझलवार, अविनाश देशपांडे, रंजना सराफ, सीमा बोधनकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले. सुरुवातीला पुलावामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर रंजना सराफ यांचा शैलेश दाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात पखावज वादक मधुकर आटोले व तबला वादक राम खडसे यांच्या जुगलबंदीने झाली. दोघांचाही हा पहिलाच जुगलबंदीचा कार्यक्रम असल्यामुळे रसिकांमध्येही चांगलीच उत्सूकता होती. मधुकर आटोले यांनी जुगलबंदीच्या सुरुवातीला तबला आणि मृदंग यांच्यातील फरक विशद केला. ते म्हणाले, या दोन्ही वाद्यात ‘धा’ हे एकच अक्षर समान असते. या ‘धा’ रुपी परणाने त्यांनी मृदंगवर थाप दिली.

त्यांच्या बोलांना तबल्यावर अलगद झेलत राम खडसे यांनी सुरेख वादन केले. बोल, ताल आणि संवादिनीच्या सुरांची जुगलबंदी उत्तरोत्तर रंगत गेली. पखवाज आणि तबल्यावर दोन्ही युवा कलाकाराच्या लिलया फिरणाऱ्या बोटांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. त्यांना लहऱ्यावर श्रीकांत पिसे यांनी संगत केली.

त्यानंतर रेखा जैन यांचे भरतनाट्यमचे सादरीकरण झाले. या युवा नृत्यांगनेने सुरुवातीला पुष्पांजली सादर केली. त्यानंतर त्यांनी सरस्वती स्तुती सादर करीत रसिकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचा समारोप त्यांनी तिल्लना या जलद व उत्साहाने भरलेल्या भरतनाट्यम नृत्याने केला. शैलेश दाणी यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय काळे यांनी केले.