नागपूर : गोंदिया ते नागपूर येणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसमध्ये एका तरुणीशी छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर केवळ २४ तासांच्या आत लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ही घटना २१ सप्टेंबरच्या सायंकाळी घडली. पीडित तरुणी विदर्भ एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२१०६) च्या सामान्य डब्यातून प्रवास करत होती. सायंकाळी साडेचारच्या सुमारास गाडी नागपूर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर आल्यानंतर ती उतरू लागली. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन केले आणि पळ काढला.
तरुणीने तत्काळ नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन लोहमार्ग पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे गोंदिया येथील जितेंद्र विजय लारोकर याला अटक करण्यात आली. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.