नवी दिल्ली : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने महिलांसाठी मोठी भेट जाहीर केली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत तब्बल २५ लाख मोफत एलपीजी कनेक्शन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे देशभरातील उज्ज्वला लाभार्थ्यांची संख्या १०६ दशलक्षांपर्यंत पोहोचणार आहे.
सोमवारी पत्रकार परिषदेत पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी ही घोषणा केली. प्रत्येक कनेक्शनवर सरकारकडून सुमारे ₹२,०५० इतका खर्च करण्यात येणार असून यात एक मोफत सिलेंडर, गॅस स्टोव्ह, रेग्युलेटर व इतर आवश्यक उपकरणे मिळणार आहेत.
सध्या सरकार ३०० रुपयांचे अनुदान देत असून, उज्ज्वला लाभार्थ्यांना सिलेंडर फक्त ₹५५३ मध्ये रिफिल करता येतो. पुरी यांनी सांगितले की, “ही योजना महिलांसाठी सशक्तीकरणाचे साधन आहे. नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर मोदी सरकारकडून मातांसाठी व भगिनींसाठी ही खास भेट आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेला आणखी बळ मिळेल.”
पात्रता कोणासाठी?
- गरीब कुटुंबातील प्रौढ महिला
- अनुसूचित जाती व जमातीतील महिला
- ज्यांच्या घरी आधीपासून एलपीजी कनेक्शन नाही
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक खाते
अर्ज कसा करायचा?
- उज्ज्वला २.० योजनेसाठी अधिकृत वेबसाइटवर (https://pmuy.gov.in/e-kyc.
html) जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. - इंडेन/भारतगॅस/एचपी गॅस यापैकी कंपनी निवडा.
- कनेक्शन प्रकार “उज्ज्वला २.०” निवडा.
- राज्य, जिल्हा, वितरकाची माहिती भरावी.
- मोबाईल नंबर टाकून ओटीपी व्हेरिफाय करावा.
- वैयक्तिक माहिती, पत्ता, बँक तपशील देऊन अर्ज सबमिट करावा.
- अर्ज पूर्ण झाल्यावर मिळालेला संदर्भ क्रमांक जवळच्या गॅस एजन्सीकडे द्यावा. दरम्यान यामुळे ग्रामीण व शहरी गरीब महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा लाभ मिळणार असून धुरामुक्त स्वयंपाकघराकडे वाटचाल आणखी वेग घेणार आहे.