Published On : Sat, Jun 21st, 2025
By Nagpur Today Nagpur News

‘योग’… तणावमुक्त आयुष्याची गुरुकिल्ली;जागतिक योग दिनानिमित्त विशेष 

Advertisement

नागपूर: आजचा माणूस धावतोय… वेळेपाठी, यशामागे, जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली. पण या धावपळीत त्याचं स्वतःकडे लक्ष द्यायचं विसरणं सुरू आहे. त्यामुळेच आजच्या युगात ‘योग’ ही केवळ एक क्रिया नाही, तर जीवनशैली बनणं गरजेचं आहे.

 २१ जून  जागतिक योग दिन, हा दिवस आपण प्रत्येक वर्षी साजरा करतो, पण प्रश्न असा आहे की योग प्रत्यक्ष आयुष्यात किती उतरतो? कारण योग म्हणजे फक्त आसनं नव्हेत. योग म्हणजे मन, शरीर आणि आत्मा यांचं संतुलन. आज जगभर लाखो लोक योगाकडे वळत आहेत, कारण हे एकमेव शास्त्र आहे जे शांत झोप, तणावमुक्त मन, आणि सशक्त शरीर हे तिन्ही एकत्र देतं. दररोज अवघ्या काही मिनिटांची योगाची सवयआपल्या आरोग्यात आमूलाग्र बदल घडवू शकते.
आज जेव्हा अनेक तरुण anxiety, depression, थकवा, अनिद्रा या समस्यांना सामोरं जात आहेत – तेव्हा योग ही केवळ उपाययोजना नसून, मूलभूत गरज ठरत आहे. शाळकरी विद्यार्थी असो, IT क्षेत्रात काम करणारा प्रोफेशनल असो, गृहिणी असो किंवा ज्येष्ठ नागरिक प्रत्येकासाठी योग वेगळ्या पातळीवर लाभदायक ठरतो. आज अनेक नामांकित डॉक्टरही औषधांबरोबर योगसाधनेचा सल्ला देतात. योग आपल्याला केवळ शरीराने नव्हे, तर विचारानेही सशक्त बनवतो. तो स्वतःकडे पाहण्याची नजर देतो. आणि म्हणूनच, हा दिवस केवळ साजरा करण्यासाठी नसून, योगाला आपल्या रोजच्या जीवनात समाविष्ट करण्याचा संकल्प करण्यासाठी असतो.
योग केवळ आसन नव्हे, तो शरीर, मन आणि आत्म्याचं शुद्धिकरण- वर्षा अग्रवाल 
 आज माणसाकडे सर्व सुविधा आहेत, पण मन:शांती हरवली आहे. ही शांती मिळवण्यासाठी योग आवश्यक आहे,असे नागपुरातील वर्षा अग्रवाल यांनी सांगितले. धंतोली परिसरात राहणाऱ्या वर्षा एक योगगुरू असून गेल्या अनेक वर्षापासून महिलांना योगा शिकवतात. आज जागतिक योगा दिनानिमित्त ‘नागपूर टुडे’शी बोलताना वर्षा अग्रवाल म्हणाल्या की,योग केवळ आसन नव्हे, तो शरीर, मन आणि आत्म्याचं शुद्धिकरण आहे.रोज सकाळी तुम्ही जसं बाहेरच्या कपड्यांची स्वच्छता करता, तशीच योगाद्वारे आतल्या मनाची स्वच्छता करा.माणूस घर, गाडी, पैसा कमवतो. पण स्वतःचा ‘स्व’ हरवतो. योग म्हणजे तो हरवलेला ‘स्व’ पुन्हा शोधण्याचा मार्ग आहे.
 योग म्हणजे केवळ “वर्कआउट” नव्हे, तर “वर्क-इन”- आज जीममध्ये घाम गाळणाऱ्यांची संख्या जितकी वाढते आहे, तितकाच वाढता ओघ योगाकडे वळणाऱ्यांचा आहे. कारण त्यांनी अनुभवलं आहे की योग केवळ शरीर नाही, तर मनालाही आरोग्य देतो. योगाची खरी कमाल म्हणजे, तो शांततेने शरीरावर परिणाम करतो. ना खाल्लेलं वजन कमी करतं, ना भरमसाठ उड्या मारायला लावतो. पण परिणाम मात्र खोलवर करतो.
शरीरासाठी नैसर्गिक औषध म्हणजे ‘योग’- 
आजच्या धावपळीत जगणाऱ्या जीवनात, आपण सर्वजण काही ना काही शारीरिक तक्रारींचा सामना करत आहोत. पाठदुखी, थकवा, रक्तदाब, लठ्ठपणा, झोपेच्या समस्या आणि अजून बरेच काही. पण या सर्व समस्यांचं मूळ एकाच ठिकाणी आहे. अस्वस्थ जीवनशैलीआणि यावर उपाय आहे  “योग”. योग ही केवळ प्राचीन भारतीय परंपरा नसून, आजच्या काळातही शरीरासाठी एक प्रभावी आणि नैसर्गिक औषध ठरते आहे. दररोज काही मिनिटं योगासने आणि प्राणायाम केल्याने शरीरात चमत्कारिक बदल जाणवू लागतात.
-आरती सोनकांबळे 
Advertisement
Advertisement