‘ करा हो नियमित योगासन’ म्हणत हजारो योग साधकांनी केले योगा प्रात्यक्षिक
– श्वेत रंगात रंगले यशवंत स्टेडियम
नागपूर: नियमित योगासनामुळे शरीर आणि मनाचे स्वास्थ्य उत्तम राहते, अनेक आजारांना दूर ठेवता येतात याबाबत जनजागृती करणारे ‘करा हो नियमित योगासन’ हे गीत म्हणत शनिवार (ता. २१) सकाळी हजारो योगसाधकांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. निमित्त होते ते नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक योग दिनाचे.
‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित मनपाचा जागतिक योग दिन कार्यक्रम यशवंत स्टेडीयमवर शनिवारी पार पडला. यंदाच्या दशकपूर्ती सोहळ्याला केंद्रीय मंत्री मान. श्री. नितीन गडकरी, आमदार श्री. प्रवीण दटके, पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जनार्दन योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष श्री. संजय सिंग, कमांडंट नवीन राम, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. अनुप खांडे, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, श्री. गणेश राठोड, श्री. राजेश भगत, श्री. विनोद जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, हिंद केसरी श्री. योगेश दोडके, यांच्यासह मनपाचे उपायुक्त, दहाही झोनचे सहाय्यक आयुक्त इतर कर्मचारी शहरातील विविध योगाभ्यासी मंडळचे स्वयंसेवक व हजारोंच्या संख्येत नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नागपूर शहर नशा मुक्त करण्याकरिता नागपूर पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन थंडर’ अंतर्गत उपस्थितांना नशा मुक्तीची प्रतिज्ञा देण्यात आली. पोलीस निरीक्षक श्रीमती अनामिका मिर्जापुरे यांनी प्रतिज्ञा देवोवली.
जागतिक योग दिनाच्या आठवणींनींना उजाळा देत श्री रामभाऊ खांडवे यांनी दैनंदिन जीवनातील नियमित योगाभ्यासाचे महत्त्व सांगितले. नियमितपणे योग करण्याचे महत्व त्यांनी विषद केले. तसेच नागपुरात जनार्दन स्वामी यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा योग दिन साजरा करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.
सर्वप्रथम मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महानगरपालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तयार केलेल्या बोधचिन्हाची प्रतिकृती प्रदान केली. तसेच महापालिकेचा मानाचा दुपट्टा प्रदान करण्यात आला. तसेच कार्यक्रमात महानगरपालिकेचे कर्मचारी असलेले भारत डेलीकर यांनी आशीयन योगासन चॅम्पीयनशीपमध्ये सुवर्णपदक मिळविल्याबद्दल केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अथर्व डाके यांनी यावेळी मुख्य कार्यक्रमाच्या पूर्वी योगगीत गायिले. त्यानंतर विविध योगासने प्रातिनिधिक स्वरूपात करवून घेतली. त्यांच्यासोबत स्टेडियममध्ये उपस्थित हजारो साधकांनी ही सारी आसने केलीत. यावेळी सुरुवातीला ‘खेल खेल मे योगासन हम करते है, या गीतावर योग प्रात्यक्षिकेची सुरुवात करण्यात आली. तर प्रत्येक आसन संपल्यानंतर ‘करा हो नियमित योगासन’ या योग गीताच्या शब्दांनी यशवंत स्टेडियम दुमदुमले होते. प्रसन्न आणि निरामय वातावरणात हा संपूर्ण सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले तर आभार क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर यांनी आभार मानले.
चित्तथरारक प्रात्यक्षिके
जागतिक योग दिननिमित्त घेण्यात आलेल्या सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात नागपूर जिल्हा योग असोशिएशनचे अनिल मोहगावकर व संदीप खरे यांच्या चमूने योगाचे विविध मानवीय मनोरे व कठीण योगासनाचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे सादरीकरण करणाऱ्या संघात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग होता.
योगमय वातावरण
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सकाळी ६ वाजतापासून यशवंत स्टेडियममध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ५.३० पासून यशवंत स्टेडियमकडे येणाऱ्या साधकांच्या गर्दीने धंतोली परिसरातील रस्ते फुलून गेले होते. यशवंत स्टेडियममध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक साधकावर पुष्पवर्षाव करण्यात आला. एका रांगेत शिस्तबद्ध रीतेने योगा करणाऱ्या साधकांच्या गर्दीने स्टेडियममधील वातावरण योगमय बनले.
विविध मंडळांचा सहभाग
जागतिक योग दिन कार्यक्रमात जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर जिल्हा योग असोशिएशन, आरपीएफ, सीआरपीएफ, एनएचएआई,आदींनी सहभाग नोंदविला.
यशवंत स्टेडियमवर रंगले श्वेत रंगात
योग दिनाच्या निमित्ताने स्टेडियममध्ये एकत्रित होणाऱ्या साधकांना धवल वस्त्र परिधान करून येण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले होते. त्यानुसार हजारोंच्या संख्येत धवल वस्त्र परिधान करून आलेल्या साधकांमुळे स्टेडियम पांढऱ्या रंगाने व्यापले होते.