Published On : Mon, Mar 1st, 2021

योग आणि ध्यान साधना प्रशिक्षण शिबिराचा थाटात समारोप

कामठी :- मातोश्री अंजनाबाई बहुउद्देशीय महिला विकास मंडळ नागपूरद्वारे फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ध्यानसाधना प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा समारोप समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला.

समारंभाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव व ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ.पुरणचंद्र मेश्राम अध्यक्ष म्हणून लाभले होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणतज्ज्ञ व विद्यार्थी नेते श्रीहरी बोरीकर यांनी मार्गदर्शन केले. प्रस्तुत समारंभाला विषेश अतिथी म्हणून पेफीचे (PEFI) राष्ट्रीय सचिव डॉ.पियुष जैन, राष्ट्रीय योगा संस्थेचे अध्यक्ष डॉ. एम. एम. घारोटे, डॉ. राकेशकुमार शास्त्री, प्रा. डॉ. सी. डी.नाईक, योगतज्ज्ञ इंजि. संजय खोंडे यांची उपस्थिती लाभली होती. करोना मानवावरील जागतिक स्वरूपाचे संकट असून त्याविरुद्ध लढा देण्यासाठी भारतीयांची मानसिकता सुदृढ करण्याच्या दृष्टीने सदर प्रशिक्षणाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल सर्व वक्त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.

या प्रसंगी प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आयोजक डॉ. वंदना इंगळे, डॉ.ललिता पुन्नया, डॉ. राजश्री मेश्राम हे उपस्थित होते.
स्मृतिशेष मातोश्री अंजनाबाई यांच्या प्रतिमेला हारार्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून समारोप सोहळ्याला सुरुवात झाली. एक महिन्याच्या योग आणि ध्यानसाधना शिबिरात ओमन या देशातील तसेच भारतातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश,गुजरात राजस्थान, आसाम, अरुणाचल प्रदेश, बिहार, उत्तराखंड, छत्तीसगड, कर्नाटक इत्यादी राज्यांतून सहभागी झालेल्या प्रतिभागींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यानंतर या अभ्यासक्रमादरम्यान ज्यांनी योग, ध्यानसाधना, आहारशास्त्र,आयुर्वेद, निसर्गोपचार, इलेक्ट्रोहोमिओपॅथी, स्तन कर्करोग, तणाव व्यवस्थापन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करणारे इंजिनीयर संजय खोंडे, श्री. सचिन माथुरकर, इंजिनीयर श्रुती खोंडे, डॉ. संजय खालटकर, डॉ. इशिका खालटकर, कु. वैदेही इंगळे, डॉ. राजश्री पेंढारकर, डॉ. विनोद भुते, डॉ. विद्या लांजेवार, डॉ. दिनेश लांजेवार, डॉ.सी.डी. नाईक, डॉ.रोहिणी पाटील, डॉ. सुषमा देशमुख, डॉ.ललिता पुन्नया, डॉ. लीना बिरे-काळमेघ या सर्व मार्गदर्शकांचे डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

यानंतर मान्यवर अतिथींचे मार्गदर्शन झाले. वर्तमान युगात योग आणि ध्यान साधनेला पर्याय नाही. मानवाला आपले शरीर आणि मन निरोगी ठेवायचे असेल आणि सुखमय,शांतीमय,निरामय जीवन जगायचे असेल तर योग आणि ध्यानसाधनेला आपल्या जीवनाचा अभिन्न भाग केला पाहिजे, असा सूर सर्व वक्त्यांच्या मार्गदर्शनातून व्यक्त झाला. या प्रसंगी मनीषा व वाकडे- हिरेखन लिखित ‘बौद्ध निकायो का इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी बुद्धाच्या अष्टांगमार्गाचे महत्त्व पटवून सांगताना वर्तमान स्थितीमध्ये अष्टांगमार्गातील सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधीचे महत्त्व प्रतिपादित केले. जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असून पुढचे महायुद्ध शस्त्राऐवजी विषाणूंचे होईल. त्यावेळी नव्या पिढीमध्ये या विषाणूविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य निर्माण करण्याची आवश्कता आहे. त्यासाठी बुद्धाने सांगितलेला सम्यक समाधीचा जीवनमार्ग माणसाने अंगीकारावा,असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात योग आणि प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे एक महिन्याच्या कार्याचे आढावा वाचन डॉ. वंदना मेश्राम-इंगळे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. ललिता पुन्नय्या यांनी केले, तर डॉ. सुभाष दाढे यांनी आभार मानले. सिद्धांत मेश्राम, रचित मेश्राम, वैदेही इंगळे यांनी कार्यक्रमाचे तांत्रिक नियोजन सांभाळत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.प्रस्तुत सोहळ्याला मोठ्या संख्येने प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.

समाजकार्य महाविद्यालय कामठी, यशोदा गर्ल्स आर्ट अँड कॉमर्स कॉलेज,नागपूर, एस.जी.बी.वुमन कॉलेज तुमसर, एन. जे. पटेल आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मोहाडी, एस. आर.बी.टी.कॉमर्स कॉलेज, मौदा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत ऑनलाइन योग व ज्ञानसाधना अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, हे विशेष.

संदीप कांबळे कामठी