
यवतमाळ: केळापूर तालुक्यातील वांजरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळा सण उत्साहात, मंगलमय आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचा वर्षभराचा खरा सोबती असलेल्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
पोळ्याच्या दिवशी सकाळी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना नदीवर नेऊन स्वच्छ अंघोळ घातली. त्यानंतर बैलांच्या अंगावर आकर्षक रंगकाम करण्यात आले. पाठीवर नक्षीदार झुल, शिंगांना बाशिंग व बेगड, गळ्यात घुंगुरमाळा आणि नवी वेसण घालून बैलांना सजविण्यात आले.
सायंकाळी गावातील मुख्य चौकातून सजविलेल्या बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण वांजरी गाव दुमदुमून गेले. ग्रामस्थांनीही मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
महिलांनी घराघरांत बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा महानैवेद्य दाखविला. तसेच औक्षण करून बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या पारंपरिक सोहळ्यासाठी गावातील अबालवृद्ध, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैलपोळ्याच्या निमित्ताने संपूर्ण गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रतिनिधी : विनोद पत्रे, यवतमाळ




