
रामटेक: नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात पारंपरिक मार्बती उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. रामतलाई धार्मिक मैदान, मंगळवारी वार्डातील पेपशेश्वर मंदिर तसेच शनिवारी वार्ड परिसरातून मार्बतीची मिरवणूक काढण्यात आली. उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत पारंपरिक सोहळ्याचा आनंद घेतला.
यंदाच्या मार्बती उत्सवाला मात्र सामाजिक संवेदनशीलतेची जोड मिळाली. अवघ्या दोन वर्षे दहा महिन्यांच्या श्रीनिका रोहित माकडे या चिमुकलीला दुर्मिळ SMA Type-2 आजाराने ग्रासले असून, तिच्या उपचारासाठी तब्बल १० कोटी रुपयांची गरज असल्याचे सांगण्यात आले. एवढी मोठी रक्कम उभी करणे तिच्या कुटुंबासाठी मोठे आव्हान ठरले आहे.
या पार्श्वभूमीवर मार्बती उत्सवादरम्यान श्रीनिकाच्या उपचारासाठी नागरिकांनी आर्थिक मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. ‘श्रीनिकाला वाचवण्यासाठी रामटेककरांनी एकत्र येऊया’, असा संदेश देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन करण्यात आले.
सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार असला, तरी प्रत्येकाने आपल्या परीने छोटीशी मदत केल्यास श्रीनिकाच्या उपचारासाठी आवश्यक निधी उभारण्यास हातभार लागू शकतो. त्यामुळे रामटेक शहरातील नागरिकांसह सामाजिक संस्था, व्यापारी, उद्योजक आणि दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन करण्यात आले.
परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवून आणणाऱ्या यंदाच्या मार्बती उत्सवातून ‘एकीच्या बळातून एका चिमुकलीचे आयुष्य वाचवूया’ हा मानवतेचा संदेश देण्यात आला.
प्रतिनिधी : अजय मेहरकुळे, रामटेक, नागपूर





