Published On : Wed, Jul 15th, 2015

यवतमाळ : वीज पंपाच्या जोडण्या डिसेंबरपर्यंत पुर्ण करा – हंसराज अहिर

Advertisement

hansraj-ahir
यवतमाळ।
शासनाने विशेष बाब म्हणून जिल्ह्यातील कृषी पंपाच्या वीज जोडण्या देण्यासही निधी मंजूर केला आहे. या जोडण्या येत्या डिसेंबरपर्यंत पुर्ण करा, अशा सुचना केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केल्या.

महसूल भवन येथे कृषी पंपाच्या वीज जोडण्यासोबतच वीज वितरण कंपनी व अन्य विभागाचा आढावा अहिर यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता देसकर, आत्माचे प्रकल्प संचालक अनिल इंगळे, कृषी विकास अधिकारी जगन राठोड यांच्यासह जलसंपदा, कृषी आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना पंपासाठी तातडीने वीज जोडण्या उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना खरीपासोबत रब्बी व उन्हाळी पीकेही घेता येईल. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जोडण्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन संवेदनशिल आहे. प्रलंबित जोडण्यांसह वीज जोडण्या मागणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना येत्या डिसेंबरपर्यंत जोडणी देण्याचे निर्देश अहिर यांनी दिले.

वीज वितरण कंपनीची वेगवेगळ्या प्रकारची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची स्वतंत्र बैठकी घेवून वितरणच्या पायाभुत सुविधा व जोडणीच्या कामाला गती देण्यात यावी. शासनस्तरावर प्रलंबित कामांचा पाठपुरावा करून सदर कामे तातडीने निकाली काढण्यासाठी त्याबाबतची माहिती उपलब्ध करून देण्याबाबतही अहिर यांनी सुचविले. यावेळी वीज वितरण, वीज केंद्र, प्रलंबित व चालु कामे तसेच सौर कृषी पंपाचा योजनेचा आढावाही त्यांनी घेतला.

यावेळी जिल्ह्यातील काही कामे कंत्राटदाराने सोडून दिल्याने रखडल्याची बाब अहिर यांच्यासमोर मांडण्यात आली. सदर कंत्राटदारावर दंड आकारण्यासोबतच त्या कंत्राटदारास कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्याची सुचना अहिर यांनी यावेळी केली.