
यवतमाळ: वऱ्हाडाच्या खाद्यसंस्कृतीची खास ओळख असलेल्या प्रसिद्ध ‘बुढीच्या चिवड्याला’ आता जागतिक पटलावर नेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यवतमाळकरांच्या जिव्हाळ्याची आणि अनेक वर्षांची खाद्यपरंपरा असलेल्या या चिवड्याच्या माध्यमातून विश्वविक्रम करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ, ज्येष्ठ कलावंत आणि उद्योजक विष्णू मनोहर तसेच कोल्हापूरच्या प्राजक्ता पै शहापूरकर यांच्या पुढाकारातून तब्बल ३,५०० क्विंटल चिवडा तयार करून विश्वविक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यवतमाळच्या खाद्यपरंपरेला मिळणार जागतिक ओळख
‘बुढीचा चिवडा’ ही यवतमाळची अनेक वर्षांपासूनची लोकप्रिय खाद्यपरंपरा आहे. या पारंपरिक चवीला केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-विदेशात ओळख मिळावी, या उद्देशाने हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या माध्यमातून यवतमाळच्या खाद्यसंस्कृतीसोबतच स्थानिक सांस्कृतिक वारशालाही जागतिक व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ३,५०० क्विंटल चिवडा तयार करण्याचा हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार असून, यवतमाळकरांचा सहभागही या विश्वविक्रमासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
भारत गणेशपुरे यांचे यवतमाळकरांना आवाहन
ज्येष्ठ कलावंत भारत गणेशपुरे यांनी यवतमाळकरांना या विश्वविक्रमाच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपल्या शहराची पारंपरिक खाद्यओळख जगभर पोहोचविण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे त्यांनी म्हटले आहे.
या संभाव्य विश्वविक्रमामुळे यवतमाळचे नाव जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार असून, स्थानिक नागरिकांमध्येही या उपक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
विनोद पत्रे, यवतमाळ




