Published On : Thu, Sep 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुकेंच्या दाव्याने खळबळ, पवारांनी थेट घेतला समाचार

Advertisement

रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुकेंच्या दाव्याने खळबळ, पवारांनी थेट घेतला समाचार

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. रोहित पवार यांनी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची गुप्त भेट घेतल्याचेही फुके यांनी म्हटले आहे. या दाव्यावर रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर देत फुकेंवरच गंभीर आरोप केले आहेत.

रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात मतभेद असल्याचा दावा करत, सुप्रिया सुळे यांच्यामुळे रोहित पवार यांना पक्षात डावलले जात असल्याचे परिणय फुके यांनी म्हटले. त्यामुळेच रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केला.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

फुकेंच्या या आरोपांवर रोहित पवार यांनी उपरोधिक शैलीत प्रत्युत्तर दिले. “माझ्याबद्दलची काळजी तुम्ही करू नका,” असे म्हणत त्यांनी परिणय फुके यांच्यावर निशाणा साधला.

परिणय फुके हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याचे सांगत, या जवळिकीचा वापर विरोधी कार्यकर्त्यांविरोधात खोट्या केसेस दाखल करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. तसेच भाजप कार्यकर्त्यांचा वाळूचा व्यवसाय सुरळीत सुरू राहावा, यासाठीही या राजकीय जवळिकीचा वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Advertisement

धानाच्या खरेदीवरूनही फुकेंना सवाल-
धान खरेदीच्या मुद्द्यावरूनही रोहित पवार यांनी परिणय फुके यांना लक्ष्य केले. धानाची खरेदी कशी करावी, याचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली होती. या समितीच्या माध्यमातून फुके छत्तीसगडला गेले होते, याचा उल्लेख करत पवार यांनी त्यांच्या दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले.

“तिथे ३५०० रुपये धान खरेदी होते, तर इथे २३०० रुपये भाव दिला जातो,” असे म्हणत रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.

जरांगे पाटील यांच्यावरही फुकेंची टीका-
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्यावरही परिणय फुके यांनी टीका केली. जरांगे पाटील हे बालहट्ट करत असून त्यांच्या धमक्यांना कोणीही घाबरत नसल्याचे फुके म्हणाले. संविधानाच्या चौकटीबाहेर जाऊन मागण्या लादण्याचा प्रयत्न करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जरांगे पाटील यांची लोकप्रियता कमी झाली असून ते वैफल्यग्रस्त झाल्याचा आरोप फुके यांनी केला. त्यामुळेच ते मंत्री आणि आमदारांवर आक्षेपार्ह भाषेत टीका करत असल्याचेही त्यांनी म्हटले.

रोहित पवार आणि परिणय फुके यांच्यातील या आरोप-प्रत्यारोपांमुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात या विषयावर आणखी राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.