
नागपूर : सावनेर तालुक्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोच्छी धरणात बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह अखेर दुसऱ्या दिवशी शोधण्यात आला. बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात बुडाला होता. पहिल्या दिवशी पोलिसांसह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवूनही त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.
मृत शेतकऱ्याची ओळख दिनेश हिरूजी उईके (३६), रा. रिसाला, ता. सावनेर अशी झाली आहे. ९ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता दिनेश उईके हे बैलाला आंघोळ घालण्यासाठी कोच्छी धरण परिसरात गेले होते. यावेळी पाय घसरल्याने ते खोल पाण्यात पडले आणि बुडाले.
घटनेची माहिती मिळताच खापा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दिवसभर शोधमोहीम राबवली; मात्र पहिल्या दिवशी मृतदेह मिळू शकला नाही.
दरम्यान, १० सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजता बावनगाव नदीच्या काठावर दगडात अडकलेला मृतदेह दिसून आला. पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या सूचनेनंतर सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड आणि ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
मृतदेह सावनेर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी दिनेश उईके यांना मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास खापा पोलीस करीत आहेत.




