पुसद (यवतमाळ)। शहरालगत असलेले डोंगर आणि शेती परिसरातील खादानीतून मुरूम व पैनगंगा नदीतून रेती उत्खनन करण्याचा प्रकार तेजीने सुरू झाला आहे. या तस्करावर कारवाई करण्यासाठी महसुल प्रशासन चालढकल करून स्वहित सध्या करत असल्याने शहरातील बांधकामावर मुरूम आणि पैनगंगा नदीतून रेतीचे आणून टाकल्या जात आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी पर्यावरण प्रेमी करत आहेत.
शहराच्या एका बाजूंनी डोंगर, टेकड्या व एका बाजूनी पैनगंगा नदी आहे. हे डोंगर पोखरून दगड, मुरुमाचे विनापरवाना उत्खनन करण्याचे काम बिनदिक्कतपणे सुरू आहे. तर पैनगंगा नदीतून बेसुमार वाळूचा उपसा करून साठेबाजी करत दाम दुप्पटीने विक्री करण्याचा गोरखधंदा राजकीय वरद हस्ताने सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने खदानी, स्टोन क्रशन यांच्या परवान्यांचे नूतनीकरण केलेले नाही, तर नदीची एकही रेती पेंडाची हर्रासी केली नाही. त्यामुळे रेती, दगड, मुरुमाचे उत्खनन करण्यास सध्या बंदी आहे. असे असतानाही शहरालगतच्या काही खदानीतून महसूलच्या काही अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकार्यांना हाताशी रात्रंदिवस उत्खनन सुरू करून रेती, मुरूम, दगडाचे साहित्य शहर व परिसरात सुरु असलेल्या रस्ते, इमारती बांधकामाला पुरवठा केला जात आहे. हि माहिती प्रशासनाला असताना याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने तस्करांना रान मोकळे झाले आहे. याबाबतच्या अनेक तोंडी व लेखी तक्रारी महसूल खात्याचे काही अधिकारी – कर्मचारी यांच्याकडे पर्यावारन प्रेमी नागरिकांनी केल्या. मात्र गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर कोणताच परिणाम झाला नाही. उलट माफियांच्या वाहनधारकाकडून आमचे काहीच वाकडे होऊ शकत नाही. अश्या अविर्भावात दिवस- रात्र उत्खनन करून वाहतूक केली जात आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे गौण खनिजाच्या उत्खननासाठी पर्यावरण समितीची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारनेही या संदर्भातील नियम तयार केले आहेत. मात्र या नियमांचे पालन न करता बिनबोभाट उत्खननाचा कारभार सुरु आहे. यासंबंधी तरी उत्खननाच्या नियमानुसार सकाळी सूर्योदय ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत गौण खनिज काढता येते. परंतु हे सर्व नियम धाब्यावर ठेवून रात्री – अपरात्री उत्खनन केले जात आहे.