Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

| | Contact: 8407908145 |
Published On : Wed, Aug 14th, 2019

यश बोरकर खून प्रकरण : आरोपीच्या फाशीवर निर्णय राखून

नागपूर : यश बोरकर खून प्रकरणात जप्त करण्यात आलेला मोबाईल व सीमकार्डसंदर्भात आढळून आलेली अस्पष्टता दूर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सुनावणी घेतली. दरम्यान, न्यायालयाने आरोपीचे वकील अ‍ॅड. संतोष चांडे व सरकारी वकील अ‍ॅड. संजय डोईफोडे यांना आवश्यक प्रश्न विचारून, प्रकरणावरील निर्णय पुन्हा राखून ठेवला.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संतोष अरविंद काळवे (२६) असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा दापोली (काळवे), ता. मालेगाव, जि. वाशीम येथील रहिवासी आहे. तो खापरी येथे भाड्याच्या खोलीत राहून मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरी करीत होता. परंतु, त्याने वस्तीतील लोकांना पोलीस असल्याचे सांगितले होते. आरोपीची बोरकर कुटुंबाशी व ११ वर्षीय बालक यशसोबत चांगली ओळख होती.

त्याने याचाच गैरफायदा घेऊन यशचा विश्वासघात केला. १० जून २०१३ रोजी यश घराजवळच्या परिसरात मित्रांसोबत खेळत होता. दरम्यान, आरोपी मोटरसायकलने तेथे गेला व त्याने यशला चिप्स व कोल्डड्रिंकचे आमिष दाखवून सोबत चलण्यास सांगितले.

आरोपी ओळखीचा असल्यामुळे यश बेफिकिर होऊन त्याच्या मोटरसायकलवर बसला. त्यानंतर आरोपीने यशला मिहान उड्डाणपुलाच्या खाली नेले व तेथे त्याचा काँक्रिटच्या दगडाने ठेचून खून केला, असे सरकार पक्षाचे म्हणणे आहे. सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयासमक्ष प्रकरण सादर केले आहे. तसेच, आरोपीने या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले आहे.

Stay Updated : Download Our App
Mo. 8407908145