Published On : Thu, Sep 27th, 2018

प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचे निधन

पुणे: ब्र, भिन्न आणि कुहू या गाजलेल्या कादंबरींच्या लेखिका आणि कवियत्री कविता महाजन यांचे गुरुवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. कविता महाजन या काही दिवसांपासून न्यूमोनियाने आजारी होत्या. बाणेर येथील चेलाराम हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना गेल्या महिन्याभरापासून फुफ्फुसाचा त्रास जाणवत होता.

कविता महाजन यांचा जन्म नांदेडमध्ये झाला होता. मराठी विश्वकोषाचे माजी सचिव एस. डी. महाजन यांच्या त्या मुलगी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयमध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि संभाजीनगरच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्या मराठी साहित्य या विषयाच्या एम.ए. आहेत.

…ते स्टेटस
आठवड्यापूर्वी त्यांनी फ़ेसबुकवर एक स्टेटस लिहिले होते, ‘माणसं गेली की, उत्सुकतेने ढीगभर काव्यात्मक श्रद्धांजल्या वाहणारे आपण. हयात असलेल्या व्यक्तींसाठी आपल्याला वेळ असतो का?’ असा प्रश्न त्यांनी विचारला होता.

कविता महाजान यांना मिळालेले पुरस्कार –
– यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार (2008)
कवयित्री बहिणाई पुरस्कार (2008)
– साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार (रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला 2011)
– मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कारासाठी ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहासाठी (2013)