Published On : Sat, Dec 1st, 2018

जागतिक एड्स दिन; एचआयव्हीसोबतचे जगणे करा आनंदाचे

Advertisement

नागपूर : थोडं संकोचत पण बऱ्याचशा आत्मविश्वासाने… काहीशा दाटून आलेल्या अंत:करणाने पण ठाम निर्धाराने ती बोलू लागली. तिची भाषा तिथे महत्त्वाची नव्हती. वाक्यरचना किती पल्लेदार आहे हे कुणाला पहायचं नव्हतं. व्याकरणाच्या चुका शोधायच्या नव्हत्या. आपण खूप थोरामोठ्यांसमोर, अनुभवी व्यक्तींसमोर बोलत आहोत याची तिला जाण होती… पण तिची कुणाशी स्पर्धा वा तुलना होणार नव्हती. सगळ््यांना तिचं ऐकायचं होतं. ती मग बोलत राहिली… ती होती, एचआयव्ही पॉझिटिव्ह आयुष्य जगणारी एक स्त्री.

कल्पना (काल्पनिक नाव). आपल्या आयुष्याचा संपूर्ण पट तिने उलगडून तर दाखवलाच पण त्यातील हिमतीच्या जागा, निर्धाराने घेतलेली वळणे अधोरेखित करीत त्यांना सर्वांच्या मनावरही ठसवले. पतीकडून आलेलं एड्सचं आजारपण, त्याचा झालेला अपघाती मृत्यू, मुलांची झालेली आबाळ, त्यातून काढलेली वाट आणि निरोगी आयुष्याची धरलेली कास… असा सगळा तो पट होता. याचे निमित्त होते १ डिसेंबरच्या जागतिक एड्स दिनाचे. सारथी ट्रस्ट व संजीवन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, आपबिती आणि सराहना हा कार्यक्रम शुक्रवारी संध्याकाळी घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लब आॅफ नागपूरचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र होते. व्यासपीठावर, सारथी ट्रस्टचे सीईओ निकुंज जोशी, संस्थापक आनंद चंद्राणी, संजीवन ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष संदीप टुले, डॉ. मिलिंद भृशुंडी आणि डॉ. ऊर्मिला वराडपांडे उपस्थित होत्या.

एचआयव्हीग्रस्तांसाठी आपले आयुष्य वेचलेल्या अनेक कार्यकर्त्यांचा यावेळी हृद्य सत्कार करण्यात आला. त्यात या क्षेत्रातील पहिल्या समुपदेशक डॉ. ऊर्मिला वराडकर, रेड क्रॉस सोसायटीच्या प्रकल्प समन्वयक हेमलता लोहवे, एचआयव्ही पीडितांसोबत दीर्घकाळ काम केलेल्या डॉ. मेधा नवाडे, एचआयव्हीबाबत जनजागरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या तनुजा फाले, ट्रान्सजेंडर्सच्या नेत्या विद्या कांबळे, अमित टेंभुर्णे व मेघा पेशकर यांना गौरवान्वित करण्यात आले.

एचआयव्हीवरील औषधांबाबत डॉ. मिलिंद भृशुंडी यांनी नवीनत्तम संशोधनांची माहिती दिली. निकुंज जोशी यांनी स्वअनुभव मांडले तसेच सारथी ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली. डॉ. उर्मिला वराडपांडे यांनी समुपदेशनाच्या क्षेत्राविषयीचे मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोपात प्रदीप मैत्र यांनी, या क्षेत्रातील उल्लेखनीय कामाविषयी सगळ््यांचे अभिनंदन केले. यावेळी सर्व सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. एचआयव्हीच्या क्षेत्रात असलेले गैरसमज दूर होण्याची गरज यावेळी सर्वांनीच विशद केली. अधिक जनजागरणाकरिता मोठ्या प्रमाणात संयुक्त प्रयत्न व्हायला हवेत यावर सर्वांचे एकमत होते.

कार्यक्रमाचे संचालन स्वाती खंडेलवाल यांनी, प्रास्ताविक नरेश सनके यांनी तर आभारप्रदर्शन विद्या कांबळे यांनी केले.