Published On : Thu, Oct 12th, 2017

मनपाच्या शाळेतील विद्यार्थांचा शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी मनपाचे शिक्षक सक्षम

Dilip Dive
नागपूर:
मनपातील शाळांचा आणि पर्यायाने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी मनपा कटिबद्ध आहे. मनपाच्या शाळेतील विद्यार्थांचा शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी मनपाचे शिक्षक सक्षम आहेत. शिक्षण विभागातर्फे राज्य शासनाच्या धोरणाअंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शिक्षण विभागाच्या या अभिनव उपक्रमात आपण नेहमीच सोबत राहू, असे प्रतिपादन महानगरपालिकेच्या शिक्षण विशेष समितीचे सभापती दिलीप दिवे यांनी केले.

मनपाच्या शिक्षण विभागातर्फे महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे शिक्षकांसाठी बुधवारी (ता. ११) ला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत मनपा व प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मनपाच्या शाळेतील मुख्याधापक व शिक्षक यांच्या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार आणि कार्यशाळेतील प्रमुख वक्ते प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे अधिव्याख्याता प्रा. रवींद्र रगतकर, केंद्रप्रमुख भूपेश चव्हाण, विषय सहायिता प्रतिभा गोहणे, मनपा शिक्षण संघाचे सचिव देवराव मांडवकर प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे म्हणाले, मनपाच्या शाळा डिजीटल होण्याच्या मार्गावर आहे. राज्य शासनाचे शैक्षणिक विषयावरील जे धोरण आहे ते प्रगत आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाच सूत्री धोरणाअंतर्गत दिलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी मनपाचा शिक्षण विभाग योग्यरित्या पार पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, शाळेतील मुख्याधापक हा शाळेचा आधारस्तंभ असतो, तोच मजबूत असायला हवा. राज्यातील २० अद्ययावत शाळांमध्ये मनपाच्या शाळेचा वाटा हा ५० टक्के राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मनपाचा शिक्षण विभाग आता कात टाकत आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांच्या तुलनेत मनपाचे शिक्षक आणि विद्यार्थी कमी राहू नये यासाठी त्यांचे ‘अपग्रेडेशन’ वेळोवेळी करण्याचा आम्ही आता संकल्प केला आहे. हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठीच अशा कार्यशाळा सुरू केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.

शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळा आयोजनामागील भूमिका विषद केली. माहे जूनपासून विविध प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून शिक्षकांना देण्यात येत आहे. याचा फायदा प्राथमिक व माध्यामिक शाळेतील शिक्षकांना नक्कीच झाला आहे. विद्यार्थांचा पाया म्हणजे प्राथमिक शिक्षण होय. तो पायाच मजबूत केला तर त्यानुसार विद्यार्थी घडायला मदत होते. शाळेची व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी कसा प्रयत्न करता येईल याचा विचार शिक्षकांनी करावा. मेहनत घ्यावी. शंभर टक्के शाळा कशी प्रगत होईल याचा विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रारंभी मान्यवरांचे स्वागत शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी केले. संचालन श्रीमती शुभांगी पोहणे यांनी केले. आभार सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर यांनी मानले. कार्यक्रमाला क्रीडा अधिकारी नरेश चौधरी, शाळा निरिक्षक, मनपाच्या सर्व शाळांमधील मुख्याधापक व शिक्षक उपस्थित होते.