Published On : Wed, Oct 11th, 2017

वेळेत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना महावितरणची कारणे दाखवा नोटीस

Advertisement


नागपूर:
खरबी येथील वीज उपकेंद्राचे काम विहित कालावधीत पूर्ण केले नसून या कामासाठी नियुक्त मेसर्स शलाका इंडस्ट्रीज या कंत्राटदाराने अद्याप कामालाही सुरुवात केली नसल्याचा ठपका ठेवीत महावितरणने या कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या शिवाय खरबी रॊड वीज उपकेंद्रास हुडकेश्वर उपकेंद्रावरून अतिरिक्त भूमिगत वाहिनी टाकण्यासाठी नियुक्त मेसर्स भारत इलेक्ट्रिकल यांनीही हे काम पूर्ण केले नसल्याने त्यांना देखील नोटीस बजाविण्यात आली आहे.

नागपूर ग्रामीण विभागातील खरबी उपकेंद्रातून पूर्व नागपूर, खरबी, बहादूरा, गोधनी सिम या भागांतील वीज ग्राहकांना लाभ होणार असून उमरेड उपकेंद्रातून पाचगावला नियमित वीज पुरवठा होत नसल्याने पारडी – पाचगाव – खरबी या ३३ के.व्ही. वहिनीचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतो. अखंडित वीज पुरवठ्यासाठी मेसर्स रुद्राणी इलेकट्रीकल याना येत्या ३-४ दिवसात नवीन ब्रेकर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाचगाव वीज उपकेंद्राची निगा योग्य प्रकारे न राखल्या बद्दल पाचगाव येथील शाखा अभियंता यांना नोटीस बाजवण्यात आली. महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता आर. जी. शेख यांनी आज उमरेड तालुक्यास भेट देऊन येथील वीज यंत्रणेचा आढावा घेतला. या वेळी त्यांचा सोबत अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, कार्यकारी अभियंता प्रफुल लांडे उपस्थित होते.

भिवापूर तालुक्यातील उमरेड उपकेंद्रातील ३३ के.व्ही वेकोली उपकेंद्रातील मंगरूळ – सिर्सी या ११ के.व्ही वीज वाहिनीवरील दोन उच्चदाब ग्राहक कृषी वाहिनीवर असल्याने त्यांना केवळ ८ ते १० तास वीज पुरवठा मिळत होता. त्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी नवीन वीज वाहिनी उभारून येत्या १५ दिवसात ती सुरु करावी असे निर्देष मुख्य अभियंता यांनी यावेळी दिले. उच्चदाब ग्राहकांना २४ तास वीज मिळणार असल्याने महावितरणचा महसूल वाढीस चालना मिळणार आहे. २२० के.व्ही उमरेड उपकेंद्रातून नवीन ३३ के.व्ही वाहिनेचे काम मेसर्स ज्योती इलेकट्रीकल यांना दिले होते. हे काम अंदाजे ५० टक्के पूर्ण झाले आहे. या वाहिनीची तपासणी बुधवारी पूर्ण करण्यात आली. सदर काम पूर्ण झाल्यास ३३ के.व्ही वेकोली उपकेंद्राला अतिरिक्त वीज वाहिनी मिळणार असून यामुळे मकरधोकडा, सिर्सी, बेला, पाचगाव येथील वीज ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.

मुख्य अभियंता आर. जी. शेख यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी मुख्यालयी राहून वीज ग्राहकांना योग्य दाबाचा आणि गुणवत्तापूर्वक वीज पुरवठा करावा अश्या सूचनाही यावेळी केल्या.