Published On : Fri, Feb 7th, 2020

‘पब्लिक बाईक शेअरींग’ विषयावर कार्यशाळा

Advertisement

नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (एनएसएससीडीसीएल) (NSSCDCL) च्या वतीने यूरोपीय संघाच्या सहकार्याने गुरूवारी (ता.६) ‘पब्लिक बाईक शेअरींग’ विषयावर एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेमध्ये नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्याबाबत उपयुक्त मॉडेलवर चर्चा करण्यात आली.

कार्यशाळेमध्ये स्मार्ट सिटी चे सीईओ डॉ.रामनाथ सोनवणे, स्मार्ट सिटी चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, इंटरनॅशनल अर्बन कॉर्पोरेशन (आययूसी)चे वरिष्ठ विशेषज्ञ नीलाभ सिंह, आययूसी भारतातील टिम लिडर पेनागोटिस करमनोस, आशीष वर्मा, उदीत जैन, श्री. गांधी यांच्यासह काल्स्त्रू शहरातील प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

इंटरनॅशनल अर्बन कॉर्पोरेशनमध्ये नागपूरच्या भागीदारी अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्मार्ट सिटी चे सीईओ डॉ.रामनाथ सोनवणे यांनी नागपूर शहरात राबविण्यात येणा-या ‘स्मार्ट बायसिकल लेन’बाबत माहिती दिली. संपूर्ण नागपूर शहरामध्ये ३४०० किमी रोड आहे. यापैकी ४०० किमी मार्गावर स्मार्ट सिटी अंतर्गत फक्त सायकल करीता वेगळे लेन तयार करण्यात येणार आहे. जर्मनीतील काल्स्त्रू शहरामध्ये ‘बाईक सिस्टीम’ प्रकल्प यशस्वी ठरला आहे. काल्स्त्रू शहराच्या अनुभवाचा नागपूर शहरासाठी उपयोग केला जाणार आहे. काल्स्त्रू आणि नागपूर शहराद्वारे भविष्यात एकत्रित असेच प्रयत्न पुढे सुरू राहतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नागपूर शहरात सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात पर्यावरणाच्या दृष्टीने बॅटरीवरील बसेस, ई-रिक्षा सुरू करण्यात आल्या आहेत. पुनापूर, भरतवाडा, पारडी, भांडेवाडी या क्षेत्राचा स्मार्ट सिटी अंतर्गत ‘बाईक सिस्टीम’ प्रकल्प राबविण्याबाबत विशेष भर देण्यात असल्याचेही त्यांनी विशेषत्वाने सांगितले.

प्रारंभी कार्यशाळेमध्ये काल्स्त्रू शहराच्या विशेषज्ञांनी नागपूर शहरातील वाहतूक समस्यांवरील चर्चा ऐकल्यानंतर वाहतुकीच्या सर्वोत्तम प्रणालीची निवड करण्याच्या भूमिकेबाबत आपले अनुभव सांगितले. आययूसी चे वरिष्ठ विशेषज्ञ नीलाभ सिंह यांनी ‘पब्लिक बाईक शेअरींग सिस्टीम’च्या विविध पैलूंवर सादरीकरण केले. जागतिक स्तरावर प्रचलित विविध नवीन प्रणालींचीही त्यांनी यावेळी माहिती दिली.

आययूसी चे भारताचे टिम लिडर पेनागोटिस करमनोस यांनी कार्यशाळेची संकल्पना मांडली. भारतातील १२ शहरांमध्ये सुरू असलेल्या गतिविधींची यावेळी माहिती सादर केली.