Published On : Fri, Feb 7th, 2020

महापौर चषक’ अखिल भारतीय खो-खो स्पर्धेचे थाटात उद्घाटन

नागपूर: नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘महापौर चषक’ अखिल भारतीय खो-खो स्पर्धेचे गुरूवारी (ता.६) महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते महाल येथील ‘रा.पै. समर्थ स्टेडियम’ (चिटणीस पार्क) येथे थाटात उद्घाटन झाले.

याप्रसंगी मंचावर क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, माजी महापौर ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, गांधीबाग झोन सभापती वंदना येंगटवार, नगरसेविका सरला नायक, श्रद्धा पाठक, विद्या कन्हेरे, नेहा वाघमारे, विदर्भ खो-खो फेडरेशनचे सचिव सुधीर निंबाळकर, नागपूर खो-खो फेडरेशनचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस, स्पर्धेचे निरीक्षक देविदत्त कन्होरे आदी उपस्थित होते.

Gold Rate
24 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,23,400 /-
Gold 22 KT ₹ 1,14,800 /-
Silver/Kg ₹ 1,51,600/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी महापौर संदीप जोशी यांनी सर्व खेळाडूंची मानवंदना स्वीकारली. मशाल पेटवून स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे त्यांनी जाहीर केले. राष्ट्रीय खो-खो खेळाडू ऋचिता नासरे हिने महापौरांकडे मशाल सुपूर्द केली. महापौरांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. जय-पराजय हा स्पर्धेतील एक भाग त्यामुळे खेळाडूंनी आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवून खेळाडूवृत्ती दर्शवावी, असे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी केले.

प्रास्ताविकात क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले म्हणाले, विकास कामांसह खेळ आणि खेळाडूंच्या सर्वांगीण विकासामध्ये मनपा अग्रणी आहे. विविध खेळांच्या आयोजनातून प्रतिभावंत खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मनपा कटिबध्द आहे, असेही त्यांनी सांगितले.

खेळाडूंच्या मार्चपासचे संचालन क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर यांनी केले तर आभार नितीन भोळे यांनी मानले.

यावेळी जितेंद्र गायकवाड, नरेश सवाईथुल, सुनील डोईफोडे उपस्थित होते.

६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेमध्ये देशाच्या विविध राज्यांमधून महिला व पुरुष खेळाडू सहभागी झाले आहेत. ‘महापौर चषक’ अखिल भारतीय खो-खो स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील मुलींचे ११ व मुलांचे १७ संघ सहभागी झाले आहेत. सर्व खेळाडू तसेच प्रशिक्षक व व्यवस्थापकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था मनपातर्फे करण्यात आली आहे.

स्पर्धेत सहभागी संघ

पुरुष:
विहांग क्रीडा मंडळ येरोली ठाणे, हिंद केशरी क्रीडा मंडळ कवटेपिरान, छत्तीसगड खो-खो अकादमी, सिटी पोलीस, महात्मा गांधी क्रीडा मंडळ मुंबई, सी.आर.एस.एस.यू. इचलकरंजी, राणा प्रताप क्रीडा मंडळ कुपवाड, तुळजाई क्रीडा मंडळ परतवाडा, नव महा संघ पुणे, प्रबोधिनी क्रीडा मंडळ मुंबई, डी.एच. के.के. असोसिएशन, विदर्भ क्रीडा मंडळ काटोल, जय हिंद क्रीडा मंडळ इचलकरंजी, संस्कृती क्रीडा मंडळ नाशिक, ग्रिपींग क्रीडा मंडळ ठाणे, विदर्भ युथ काटोल, मनपा शाळा संघ.

महिला:
आर.एफ. नाईक मुंबई, गुजरात खो-खो असोसिएशन, शिवभक्त क्रीडा मंडळ ठाणे, मराठा स्पोर्टिंग अमरावती, हरियाण खो-खो असोसिएशन, छत्रपती के.के.एम. उस्मानाबाद, एलेव्हन इचलकरंजी, नव जय हिंद क्रीडा मंडळ यवतमाळ, आर.एन. संघ रत्नागिरी, नरसिंग संघ पुणे, नागपूर एलेव्हन.

Advertisement
Advertisement