Published On : Fri, Feb 7th, 2020

महापौर निधीतील स्वच्छतागृहांमध्ये तृतीयपंथियांसाठीही राहणार व्यवस्था

तृतीयपंथियांच्या शिष्टमंडळाला महापौर संदीप जोशी यांचे आश्वासन

नागपूर,: महापौर संदीप जोशी यांच्या महापौर निधीतून संपूर्ण शहरभरात स्वच्छतागृहे बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी मुख्य चौकातील स्वच्छतागृहांमध्ये महिला आणि पुरुषांसोबतच तृतीयपंथियांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात येईल. यासंदर्भात तृतीयपंथियांच्या शिष्टमंडळाला आश्वस्त करतानाच संबंधित अधिकाऱ्यांना त्यासंदर्भात निर्देशही दिले.

शहरात तृतीयपंथियांसाठी स्वच्छतागृहे नसल्याने त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तृतीयपंथियांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावीत, अशी मागणी ‘ब्रेकफास्ट विथ मेयर’ या कार्यक्रमात तृतीयपंथियांच्या प्रतिनिधींनी केली होती. दरम्यान, महापौर संदीप जोशी यांच्या विविध जनसंवाद कार्यक्रमातून स्वच्छतागृहांची मागणीही समोर आली होती. याच मागण्यांच्या आधारे शहरातील पेट्रोल पंपवरील स्वच्छतागृहे नागरिकांसाठी खुली करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी पेट्रोल पंप मालकांच्या बैठकीत दिले होते. विशेष म्हणजे त्या स्वच्छतागृहांसाठी स्वच्छतादूतांची नेमणूक करीत त्यांचे नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांकही लिहिण्याचे आदेश त्यांनी दिले. ह्या व्यवस्थेव्यतिरिक्त महापौरांना विविध कामासाठी असलेला निधी संपूर्णपणे शहरात विविध ठिकाणी स्वच्छतागृहे बांधण्यासाठी वापरण्यात येण्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली असून विविध झोनमध्ये स्वच्छतागृहांसाठी असलेल्या जागांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी नुकतीच बैठकही घेतली.

दरम्यान तृतीयपंथी हक्क समितीच्या एका शिष्टमंडळाने समितीच्या सचिव राणी ढवळे यांच्यासह महापौर संदीप जोशी यांची गुरुवारी (ता. ५) भेट घेतली. या भेटीत त्यांनी तृतीयपंथियांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली. मागणीचे गांभीर्य आणि निकड लक्षात घेता महापौर संदीप जोशी यांनी शिष्टमंडळाला त्यासंदर्भात आश्वस्त केले. नागपूर महानगरपालिका उभारीत असलेल्या शहरातील काही प्रमुख चौकांतील स्वच्छतागृहांमध्ये एक ब्लॉक तृतीयपंथियांसाठी उभे करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता (स्लम) यांना दिले.

महापौरांनी तातडीने घेतलेल्या या निर्णयाचे तृतीयपंथियांच्या शिष्टमंडळाने स्वागत करीत त्यांचे आभार मानले. शिष्टमंडळात सचिव राणी ढवळे यांच्यासह पूजा वर्मा, फराह पठाण, महिमा शहा, ऐश्वर्या कामडे, पलक शेख, शबनम शेख, स्नेहा मडावी यांचा समावेश होता. यावेळी विधी समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम यांचीही उपस्थिती होती.