| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Aug 19th, 2020

  महावितरणकडून बेरोजगार अभियंत्यांना अडीच कोटीची कामे

  नागपूर– महावितरणकडून विदर्भातील स्थापत्य शाखेतील ५१ बेरोजगार पदवी आणि पदविकाधारक अभियंत्यांना नुकतीच अडीच कोटी रुपयांची कामे लॉटरी पद्धतीने देण्यात आली.

  महावितरणच्या काटोल रोड येथील कार्यालयात काढण्यात आलेल्या लॉटरीत हि कामे देण्यात आली. सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव असल्याने कोणत्याही उमेदवारांना कार्यालयात बोलविण्यात आले नाही. वेबिनारच्या माध्यमातून सर्व उमेदवारांना लॉटरीसाठी बोलविण्यात आले होते. महावितरणच्या स्थापत्य विभागाकडे ११७ बेरोजगार अभियंत्यांची नोंदणी केली आहे.यातील ५१ अभियंत्यांना लॉटरी पद्धतीने कामे देण्यात आल्याची माहिती. अधीक्षक अभियंता (स्थापत्य) राकेश जनबंधू यांनी दिली. या अभियंत्यांना महावितरणची उपकेंद्रे, उपविभागीय आणि शाखा कार्यालयातील निगडित कामाचे वाटप करण्यात आले आहे.

  राज्य शासनाने बेरोजगार अभियंत्यांना लॉटरी पद्धतीने कामे देण्याचा निर्णय सन २०१५ मध्ये घेतला होता. यानुसार नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात ४०. ८ लाखाची कामे १० अभियंत्यांना, अकोला,बुलढाणा, वाशीम,अमरावती जिल्ह्यातील ९२ लोकांची कामे २९ उमेदवारांना, चंद्रपूर,गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील १ कोटी ११ लाखाची कामे २२ अभियंत्यांना देण्यात आल्याची माहिती जनबंधू यांनी दिली. यासाठी त्यांना व्यवस्थापक (वित्त व लेखा ) सुनील गवई, कार्यकारी अभियंता नीरज गिरधर यांनी मदत केली.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145