Published On : Wed, Aug 19th, 2020

वाढदिवशी महापौर करणार केवळ डिजीटल शुभेच्छांचा स्वीकार

नागपूर: महापौर संदीप जोशी यांचा गुरुवारी (ता. २०) वाढदिवस. या दिवशी दरवर्षी शुभेच्छा देण्यासाठी नागरिक, कार्यकर्ते, स्नेही आणि आप्तजन घरी अथवा कार्यालयात येतात. यामुळे गर्दी होते. परंतु यंदाचा वाढदिवस हा कोरोना या महामारीच्या छायेत असल्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांनी यंदा केवळ डिजीटल शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

दरवर्षी सर्व चाहते शुभेच्छा देऊन प्रेम आणि विश्वास व्यक्त करतात. समस्त नागपूरकरांच्या शुभेच्छा नेहमीच सोबत आहेत.

मात्र, यंदाचे वर्ष कोव्हिड नावाच्या संकटाचे वर्ष असल्याने त्यासंदर्भात असलेले नियम पाळणे बंधनकारक आहे. कोरोनाच्या संकटात यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून सेवाकार्य करावे, ह्याच आपल्यासाठी शुभेच्छा राहतील. त्यामुळे कुणीही कार्यालयात अथवा घरी गर्दी न करता केवळ फोन कॉल्स अथवा व्हॉटस्‌ॲपद्वारेच शुभेच्छा द्याव्यात, असे नम्र आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.