Published On : Thu, Nov 28th, 2019

बैठे काम करणाऱ्यांनी आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये -डॉ. संजीव कुमार

Advertisement

आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतला आरोग्य शिबीराचा लाभ

नागपूर: शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे जास्तीत जास्त बैठे काम करण्याची जीवनशैली असल्यामुळे त्यांनी आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करता कामा नये. असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने येत्या काळात आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. याचा फायदा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.

आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत आज विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात राबविण्यात आले होते. त्यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सरिता कामदार, विभागीय सल्लागार डॉ. क्रिष्णा सिरमनवार आदी उपस्थित होते. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोफत मधुमेह तसेच रक्तदाब तपासणी करण्यात आली तसेच त्यांना आरोग्यविषयक तक्रारींविषयी समुपदेशन करण्यात आले.

विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात 26 विभागीय तसेच राज्यस्तरीय कार्यालय कार्यरत आहेत. येथील जवळपास 400 च्या वर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोग्य शिबीरात तपासणी करून घेतल्या. ज्यांच्या तपासणीमध्ये मधुमेह तसेच रक्तदाबासंबंधी काही समस्या आढळून आल्यावर त्यांना तेथे उपस्थित डॉक्टर्स मार्फत समुपदेशन करण्यात आले. पुढील तपासण्या तसेच औषधोपचाराविषयी यावेळी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले