Published On : Thu, Nov 28th, 2019

बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा -रवींद्र ठाकरे

Advertisement

नागपूर: बेटी बचाओ-बेटी पढाओ या योजनेतंर्गत गर्भ धारणापूर्व किंवा प्रसवपूर्व गर्भलिंग निदान करण्यास आळा घालण्यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देवून त्यांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहामध्ये आज बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेच्या जिल्हा टास्क फोर्सची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे बोलत होते.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, बालविकास प्रकल्प अधिकारी एम.डी.कर्नेवार, मनपा आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. भावना सोनकुसरे, शिक्षण विभागाच्या अधीक्षक श्रीमती भारती गेडाम, सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीमती अपूर्वा घटाटे, सहाय्यक शिक्षण अधिकारी राजेंद्र सुखे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार वानखेडे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बैठकीमध्ये बाललिंग गुणोत्तर, मुलींचा जन्मदर, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण, सोनोग्राफी सेंटर्स तसेच गर्भपात केंद्र व तेथील सुव्यवस्थेबाबत आढावा घेतला. मुलींच्या जन्मदराबद्दल बोलताना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले, काही विशिष्ट भागातच मुलींच्या जन्मदराचे प्रमाण कमी असल्यास त्या ठिकाणी समाज प्रबोधन करण्यासाठी अंगणवाडी सेविकेची मदत घ्यावी. अंगणवाडी सेविका त्या गावातील महिला गरोदर आहे तेव्हापासूनची माहिती त्यांच्या नोंदवहीत राहते. यामुळे त्या महिलेचा जर गर्भपात झाला असेल, तर त्याला कोणती कारणे आहेत, याबाबत अंगणवाडी सेविकेने दक्ष राहावे. गावातील तसेच त्या स्त्रीच्या घरच्या परिस्थितीची जाणीव अंगणवाडी सेविकेला असल्यामुळे तिच्या प्रबोधनाचा निश्चितच सकारात्मक परिणाम होईल.

विशिष्ट सोनोग्राफी सेंटर्सवर गर्भपाताचे प्रमाण जास्त असल्यास त्यावर विशेष लक्ष पुरवून कडक कार्यवाही करावी. यामध्ये हिंगणा, काटोल, नरखेड, सावनेर या तालुक्यामधील बाललिंग गुणोत्तर हे असमान आहे. याबाबत विशेष कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधिताना दिले.

14 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींच्या शिक्षणातील गळतीचे प्रमाण तुलनेत जास्त असलेल्या प्रभावी तालुक्यावर विशेष लक्ष पुरवण्याबाबतचे निर्देश रवींद्र ठाकरे यांनी यावेळी दिले.