Published On : Tue, Apr 17th, 2018

राज्यातील वन विभागाचे काम अभिनंदनीय; विभागाचे सुंदर काम लोकांसमोर यावे – रविना टंडन

Advertisement

मुंबई : महाराष्ट्राच्या वन विभागाने राज्यातील वृक्षाच्छादन वाढवताना पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणासाठी केलेले काम खूप अभिनंदनीय असून विभागाचे हे सुंदर काम राज्यातील जनतेसमोर मांडण्यात यावे, असे मत अभिनेत्री रविना टंडन यांनी व्यक्त केले

राज्यात 1 जुलै ते 31 जुलै 2018 या कालावधीत होणाऱ्या 13 कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, विभागाने इको साईट रिजनरेट करण्याचे काम खूप चांगल्या पद्धतीने हाती घेतले आहे. ग्रामीण भागात या कामाला उत्तम प्रतिसाद मिळत असला तरी शहरी भागात ही यासंबंधीची जनजागृती होणे गरजेचे आहे. नागरी भागात हरित सेना वाढवावी, शहरातील विद्यार्थ्यांना पर्यावरणस्नेही उपक्रमात सहभागी करून घेतले जावे, वृक्ष माणसाला काय काय देतो हे शहरी मुलांना प्रत्यक्षात जंगल भेटी घडवून आणून समजून सांगितले जावे, असे त्या म्हणाल्या.

कांदळवन संवर्धनात झालेली वाढ कौतुकास्पद असल्याचे सांगून श्रीमती टंडन यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची विशेषत्वाने नोंद घेतली. तुम्ही इतके चांगले काम करता तर ते लोकांना समजू द्या, त्यांना ते बघू द्या अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. मुंबईसारख्या शहरात वृक्ष लावायला जागा नसेल परंतु आज येथील शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे उद्या मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये आस्थापनांमध्ये काम करणार आहेत, शालेय जीवनात त्यांच्या मनात वन, वन्यजीव आणि वृक्ष लागवड याविषयी प्रेम निर्माण झाले तर मोठे झाल्यावर त्यासाठी निधी देण्यासाठी त्यांचा कल अधिक चांगला राहील, असेही त्या म्हणाल्या.

विकास आणि पर्यावरण संरक्षण या दोनही गोष्टींनी हातात हात घालून चालावे, वनक्षेत्रात काही विकास कामे होणार असतील तर वन्यजीव संरक्षणांची काळजी आणि उपाययोजना त्यात विचारात घेतल्या जाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत श्रीमती टंडन यांच्यासमोर वृक्षलागवड, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कांदळवन संवर्धन कक्ष यांच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.