Published On : Tue, Apr 17th, 2018

हुतात्म्यांना विसरणारा देश फार काळ स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही – सुधीर मुनगंटीवार

Advertisement

मुंबई : ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या हुतात्म्यांचा ज्या देशाला विसर पडतो, तो देश फार काळ स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही, असे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

राज्यातील 206 हुतात्मा स्मारकांच्या नूतनीकरणासंदर्भातील बैठक श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह राज्यभरातून आलेले स्थापत्य अभियंते आणि उपजिल्हाधिकारी आणि इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

हुतात्मा स्मारकाच्या जतन आणि संवर्धनाची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, राज्यात असलेल्या 206 हुतात्मा स्मारकांच्या नूतनीकरणाचा निर्णय राज्य अर्थसंकल्पात घोषित केला होता त्याप्रमाणे यावर काम सुरु करण्यात आले आहे. स्मारकाच्या दुरूस्तीसाठी २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याप्रमाणे अनुदानाच्या निधीचे वितरण ही सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त काही अतिरिक्त निधी लागल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी डीपीडीसीमधून तो उपलब्ध करून द्यावा.

राज्यातील सर्व हुतात्मा स्मारकांमध्ये सर्वसाधारण सोयी-सुविधांमध्ये एकसमानता ठेवावी, या सर्व स्मारकांची सविस्तर माहिती द्यावी, ज्या शहीद व्यक्तीच्या नावाने ते उभारले गेले असेल त्या व्यक्तीची माहिती शक्य असल्यास छायाचित्रासह आपणास देण्यात यावी. हुतात्मा स्मारक हे सर्व धर्मियांसाठी मंदिर असून प्रत्येक देशभक्ताला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. या स्मारकाच्या नूतनीकरणाची संधी आपल्याला मिळते आहे याचे प्रत्येकाला भाग्य वाटले पाहिजे. त्यामुळे हे काम करत असताना जर कुणाच्या सूचना असतील, अडचणी असतील तर त्या सांगाव्यात असेही ते म्हणाले. समाज म्हणून प्रत्येकाची जबाबदारी असते. ती पार पाडताना त्यात कुणी लहान किंवा मोठा असे काहीच नसते त्यामुळे चांगल्या सूचनांचे नक्कीच स्वागत केले जाईल, परंतु प्रत्येकाने हे काम करताना हुतात्मा स्मारके प्रेरणा केंद्र होतील अशा पद्धतीने काम करावे असेही ते म्हणाले.

1 जुलै ते 31 जुलै 2018 या काळात हुतात्मा स्मारकात शहिदांच्या नावाने वृक्ष लागवड केली जावी, यात माजी सैनिकांना सहभागी करून घेतले जावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्मारकाचे नूतनीकरण करताना सर्वसाधारण सोयी-सुविधांबरोबर एक सुसज्ज ग्रंथालय तिथे असावे, शहिदांवर आधारित चित्रपट संग्रहालय आणि ॲम्फी थिएटर तिथे असावे असे सांगताना त्यांनी स्मारकाच्या नूतनीकरणाचा एक उत्तम आराखडा तयार करण्याच्या सूचनाही दिल्या.

येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे 15 ऑगस्ट ला राज्यात सर्व हुतात्मा स्मारकांमध्ये एकाचवेळी राज्यभर कार्यक्रम घेता येईल अशा पद्धतीने स्मारकांच्या नूतनीकरणाच्या कामास गती द्यावी, अशा सूचना अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या.