Published On : Tue, Apr 17th, 2018

विभागीय बैठकांमध्ये प्रत्येक जिल्ह्याने ३३ टक्के वृक्षाच्छादनाचा आराखडा सादर करावा – सुधीर मुनगंटीवार

Advertisement

मुंबई : लोकसहभागातून वन विभागाने राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला असून येत्या 1 जुलै ते 31 जुलै 2018 या कालावधीत राज्यात 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवडीचा आढावा जिल्हा आणि विभागस्तरावर घेण्यात येत असून विभागीय बैठकांमध्ये प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्या जिल्ह्याचे 13 कोटी, 33 कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन सांगतांना जिल्ह्याचा 33 टक्के वृक्षाच्छादनाचा आराखडा सादर करावा, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

श्री. मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे काल संवाद साधला आणि येत्या पावसाळ्यात होणाऱ्या 13 कोटी वृक्ष लागवडीच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी वन सचिव विकास खारगे यांच्यासह वन विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आमदार निधीतून 25 लाख रुपयांचा निधी वृक्षलागवडीसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात आल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, डीपीसीमधून नाविन्यपूर्ण योजनांतर्गत 5 टक्के रक्कम वृक्ष लागवडीसाठी खर्च करता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वृक्षलागवडीचे अचूक, परिपूर्ण आणि पारदर्शक नियोजन जिल्हाधिकारी यांनी करावे, यात व्यापक लोकसहभाग मिळवावा. जिल्ह्यातील पडिक जमिनीचा शोध घेऊन तिथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करताना उत्पन्न आणि वृक्ष लागवड यांची सांगड घालावी. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, नदीकाठी मोठ्या प्रमाणात बांबू आणि फळबाग लागवड करावी. 1 मे महाराष्ट्र दिनी सर्व जिल्ह्यांमध्ये वृक्षलागवडीचे नियोजन करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावी, असेही ते म्हणाले.

शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, गावातील औद्योगिक संस्था, उद्योजक, व्यापारी, मान्यवर , बँका, सामाजिक-स्वंयसेवी- अध्यात्मिक संस्था या सर्वांना वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे. चित्रकला,वादविवाद, रांगोळी स्पर्धा, प्रभात फेऱ्या, वृक्ष दिंडीच्या माध्यमातून जनजागृती करावी असेही ते म्हणाले.

वसुंधरेचे आणि निसर्गाचे ऋण फेडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असे सांगून श्री. मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीच्या कामात पारदर्शकता, विश्वासार्हता निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. वृक्ष लागवडीसाठी निवडलेले स्थळ, त्यासाठी खोदलेले खड्डे, लावण्यात येणारी वृक्ष प्रजाती या सर्व बाबींची माहिती जीओ टॅगिंगसह वन विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड केली जावी, अनेक उद्योजक चांगल्या कामासाठी त्यांच्या कंपन्यांचा सीएसआर निधी देण्यास तयार असतात, त्यांची मदत घेतली जावी असेही ते म्हणाले. संयुक्त राष्ट्र संघाने दरवर्षी 100 कोटी झाडं लावण्याचे ठरवले आहे. एकट्या महाराष्ट्राने मागील दोन वर्षात 8 कोटी हून अधिक झाडं लावली आहेत, चालू वर्षी 13 तर पुढच्यावर्षी 33 कोटी वृक्षलागवड होणार आहे. जगात सर्वात जास्त झाडं लावण्याचा मान महाराष्ट्राला मिळेल असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी मराठवाड्याचे वृक्षाच्छादन वाढवण्यावर भर दिला. 1 ते 31 जुलै या कालावधीत प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे 31 दिवसात वृक्ष लागवडीचे 31 कार्यक्रम जिल्ह्यात घेतले जावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

एप्रिल अखेरपर्यंत वृक्ष लागवडीचे स्थळे निश्चित करून त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांची सर्व माहिती वन विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी अशा सूचना वन सचिव विकास खारगे यांनी दिल्या. ते म्हणाले, प्रत्येक शासकीय विभागांनी त्यांच्या विभागीय आणि जिल्हा आढावा बैठकांमध्ये वृक्ष लागवड हा विषय विषयसूचीत समाविष्ट करावा. वृक्ष लागवडीच्या स्थळांना भेटी द्याव्यात. मोठ्या महानगरपालिकांनी नगर परिषदांनी वृक्ष लागवडीनंतर वृक्ष संवर्धनासाठी एजन्सीची नियुक्ती करावी. उपजीविका विकसित करणाऱ्या वृक्ष लागवडीस प्राधान्य देण्यात यावे असेही ते म्हणाले.

माझी शाळा…माझी टेकडी…
औरंगाबाद विभागात 8 कोटी रोप लागवडीसाठी तयार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी यावेळी दिली. विभागात माझी शाळा- माझी टेकडी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून 2200 टेकड्यांवर शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येईल. विभागात 35 लाख विद्यार्थी आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याकडून एक याप्रमाणे 35 लाख झाड यातून लागतील अशी माहिती आयुक्तांनी यावेळी दिली. कॅम्पअंतर्गत शालेय रोपवाटिकांना गती देण्यात आली आहे. 1500 शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे. प्रत्येक शाळेत 1 हजार रोपांची नर्सरी तयार केली जात आहे. औरंगाबादमध्ये तुती लागवड मोठ्या प्रमाणात हाती घेतली गेली आहे.

वृक्षलागवडीचे काही चांगले उपक्रम
पुणे विभागात 10708 कि.मी लांबीच्या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. 1 कोटी 55 लाख 90 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असताना विभागात 2 कोटी 23 लाख रोपं उपलब्ध आहेत. नद्याकाठी वृक्ष लागवडीचा बृहतआराखडा विभागाने तयार केला आहे. देहू-आळंदी, पंढरपूर मार्गावर पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यात 3 लाख झाडे वारी मार्गाच्या दुतर्फा लावण्याचे नियोजन केले आहे. गणेश मंडळांना वृक्ष लागवडीच्या कामात सहभागी करून घेतले गेले आहे.

नाशिक विभागात 2 कोटी 53 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. विविध रोपवाटिकांमध्ये 3 कोटी 34 लाख रोपं उपलब्ध आहेत. जलसंपदा विभागाच्या मान्यतेने डॅमच्या बॅक वॉटर क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

कोकण विभागात 2 कोटी 92 लाख रोपं उपलब्ध आहेत. व्यापक लोकसहभाग, घेण्यात आला आहे पालघरमध्ये वनहक्क कायद्यांतर्गत दिलेल्या जागेवर फळझाड लागवड करण्यात येत आहे. सिंधुदूर्ग मध्ये 2 हजारांहून अधिक हेक्टरवर सीएसआर निधीतून वृक्षलागवड करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वृक्ष लागवडीची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यातून दीड लाख रोप लागतील असा अंदाज आहे. ठाण्यात पहिला ट्री क्लब देखील स्थापन झाला आहे.