Published On : Sun, Jul 1st, 2018

लोकांची कामे करा अन् नवीन लोक पक्षाशी जोडा : पालकमंत्री

नागपूर: स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात 58 वर्षे या देशावर काँग्रेसने राज्य केले. गरिबी हटावचा नारा दिला. पण गरिबी हटली नाही. याउलट केंद्र आणि राज्यातील भाजपा शासनाने गेल्या 4 वर्षात सर्वसामान्य नागरिक, गरिब, कष्टकर्‍यांसाठ़ी अनेक योजना आणल्या. या योजना पूर्ण करण्यासाठी निधीही दिला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या या योजना लोकांपर्यंत न्याव्या आणि लोकांना या योजनेचा फायदा मिळवून द्यावा. तसेच नवीन लोक पक्षाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करावे, असे कळकळीचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कार्यकर्त्यांना केले.

मौदा येथे रुक्मिणी मंगल कार्यालयात भाजपाच्या कामठी आणि मौदा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला मोठ्या संख्येने पुरुष व महिला कार्यकर्ते उपस्थित होते. व्यासपीठावर तालुक्याचे अध्यक्ष चांगोजी तिजारे, टेकचंद सावरकर, योगेश वाडीभस्मे, मनोज चवरे, अनिल निधान, सुनील लेंडे, नरेश मोटघरे, हटवार, मोरेश्वर सोरते, पाराशर, धांडे, महिला पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळेच आज राज्य आणि केंद्रात भाजपाचे शासन आहे. शासन आहे म्हणून विकास केला जात आहे, असे सांगताना पालकमंत्री बावनकुळे यांनी केंद्र शासनाच्या सर्व व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेऊन या योजनांचा लाभ गावातील नागरिकांना मिळावा यासाठी अमलबजावणी प्रक्रियेत कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे. गरीबांची कामे करून द्यावी.

त्यामुळेच नवीन लोक आपल्याशी जोडल्या जाणार आहेत. दररोज 1 तास वेळ काढा आणि पक्षाची ताकद वाढवा. सर्वसामान्य कार्यकर्त्याला पंतप्रधान पदापर्यंत जाणे हे फक्त भाजपातच शक्य आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेल्या अधिकारामुळे हे शक्य झाले आहे, हे लक्षात घ्या आणि लोकांची कामे करून मोठे व्हा. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच पक्ष वाढला आहे. शेतकर्‍यांचे कर्जमाफ, शेतकर्‍यांना कर्जवाटप, उज्ज्वला गॅस योजना, गरीबांना घरकुले, शेतकर्‍यांना लाभाच्या योजना, जिल्हा नियोजन समितीत झालेली निधीची वाढ अशा अनेक गोष्टी आहेत, त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम कार्यकर्त्यांना करायचे असल्याचेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.