Published On : Mon, Nov 25th, 2019

19 ते 26 जानेवारी दरम्यान महिला उद्योजिका मेळावा

Advertisement

महिला व बालकल्याण समिती सभापती संगिता गिऱ्हे यांची माहिती

नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे महिला व बालकल्याण समितीमार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणारा महिला उद्योजिका मेळावा यंदा 19 ते 26 जानेवारी 2020 दरम्यान रेशींमबाग मैदान येथे आयोजित कऱण्यात येत असल्याची माहिती महिला व बालकल्याण समिती सभापती संगिता गिऱ्हे यांनी दिली.

सोमवारी (ता.25) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात महिला व बालकल्याण समितीची बैठक आयोजित कऱण्यात आली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर मनीषा कोठे, समिती सदस्य मंगला खेकरे, विशाखा मोहोड, मनीषा अतकरे, साक्षी राऊत, विरंका भिवगडे, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे, समाजकल्याण विभागाच्या शारदा गडकर, नूतन मोरे, विनय त्रिकोलवार, शेखर पाचोडे, विकास बागडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महिला उद्योजिका मेळावा हा महिला बचतगटातील महिलांनी तयार करण्यात आलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता या मेळाव्याचे आयोजन केल्या जाते. यावर्षीही या मेळाव्याचे आयोजन महिला व बालकल्याण समितीमार्फत करण्यात येत असल्याची माहिती विकास बागडे यांनी दिली. यावर्षी या मेळाव्यामध्ये दिव्यांगांसाठी विशेष कार्यक्रम, महिलांची आरोग्य तपासणी शिबिर, मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी रोजगार मेळावा, केंद्र शासनाच्या योजनांची माहिती, महिलांना कायदेविषय मार्गदर्शन करणारे कार्यक्रम आयोजित कऱण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यानंतर सभापती संगिता गिऱ्हे यांनी समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रात्र निवारा केंद्राबाबत आढावा घेतला. विभागामार्फत सध्यस्थितित पाच रात्र निवारा केंद्र चालविण्यात येत आहे. यावर बोलताना सभापती संगिता गिऱ्हे यांनी सर्व समिती सदस्यांना एक तारिख निश्चित करून पाहणी दौरा आयोजित करण्यात यावा, अशी सूचना केली. संबंधित प्रभागातील नगरसेवकांना याबाबत कळविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

लाडली लक्ष्मी योजनेची जनजागृती करण्याबाबत सभापती संगिता गिऱ्हे यांनी बैठकीत चर्चा केली. नागपूर महानगरपालिकेद्वारे लाडली लक्ष्मी योजना सुरू कऱण्यात आली आहे. आतापर्यंत 3226 महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेमध्ये 3671 रूपयांचा वार्षिक प्रिमिअम असून वयाच्या वीस वर्षांपर्यत महानगरपालिका प्रिमिअम भरणार असल्याची माहिती शारदा गडकर यांनी दिली. या योजनेची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्याचे निर्देश संगिता गिऱ्हे यांनी दिले.

यावेळी आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे यांनी शासनाच्या आरोग्यदायक योजनांची माहिती बैठकीमध्ये दिली. यात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जननी सुरक्षा योजनांचा समावेश आहे. आयुष्मान भारत योजनेसाठी आवश्यक असलेले स्मार्टकार्ड नागपूर महानगरापलिकेच्या दवाखान्यात विनाशुल्क काढण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या योजनेमध्ये पाच लाख रूपयांपर्यत आरोग्य विमा काढण्यात येतो, गरजू नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

समाजकल्याण विभागमार्फत पाळणा घर योजनेसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. पाळणा घर योजना प्रायोगिक तत्वावर मनपा मुख्यालयात सुरू कऱण्याचे निर्देश सभापती संगिता गिऱ्हे यांनी दिले. गरजू महिलांना शिवणयंत्र देण्याबाबतही बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. समिती सदस्यांना पाच मशीन्स देण्याचा अधिकार देण्याचा प्रस्ताव मनीषा अतकरे यांनी समितीपुढे ठेवला. याविषयावर पुढील बैठकीमध्ये ठरवू, असे सभापती संगिता गिऱ्हे यांनी सांगितले. समिती सदस्यांच्या अभ्यासदौऱ्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

Advertisement
Advertisement
Advertisement