Published On : Mon, Nov 25th, 2019

रमाई घरकुल व पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावा!

तारा (लक्ष्मी) यादव यांचे निर्देश : गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती बैठक

नागपूर : नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी शासनातर्फे रमाई घरकुल व पंतप्रधान आवास अशा महत्वकांक्षी योजना राबविण्यात येतात. मात्र अधिका-यांच्या व कर्मचा-यांच्या उदासीनतेमुळे ख-या लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचत नाही. मनपा हद्दीतील अनेक प्रकरणे काही वर्षांपासून अजूनही प्रलंबित आहेत. नागरिकांना अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागत आहेत. त्यामुळे संबंधित अधिका-यांनी गांभीर्याने लक्ष देउन दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांचे प्रकरणे तातडीने मार्गी लावावी, असे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती तारा (लक्ष्मी) यादव यांनी दिले.

सोमवारी (ता.२५) विविध विषयांसंदर्भात सभापती तारा (लक्ष्मी) यादव यांच्या अध्यक्षतेत गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत समिती सदस्य अनिल गेंडरे, सदस्या भावना लोणारे, हनुमाननगर झोन सभापती माधुरी ठाकरे, धंतोली झोन सभापती लता काडगाये, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, लकडगंज झोन सभापती राजकुमार साहु, आसीनगर झोन सभापती विरंका भिवगडे, मंगळवारी झोन सभापती गार्गी चोपरा, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, सहायक आयुक्त मिलींद मेश्राम यांच्यासह दहाही झोनचे उपअभियंता, एस.आर.ए. संबंधित अधिकारी व सर्व झोनचे एनजीओ उपस्थित होते.

बैठकीत रमाई घरकुल योजना, एस.आर.ए., पंतप्रधान आवास योजना, पट्टे वाटप या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती तारा (लक्ष्मी) यादव यांनी सर्व विषयांचा झोन निहाय आढावा घेतला. रमाई घरकुल योजनेसाठी ११९८ लाभार्थी मंजूर असून केवळ ४१९ जणांनाच पहिला धनादेश वितरीत करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने २०१७-१८ यावर्षातील प्रलंबित तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.

एस.आर.ए.अंतर्गत मनपातर्फे मौजा नारी येथे बांधण्यात आलेल्या सदनीकेमध्ये अनेक सुविधांची वाणवा आहे. या सदनीकेला भेट देउन नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या होत्या. या सदनीकेमध्ये रस्ता, पिण्याचे पाणी, स्वच्छता या मुलभूत सुविधांबाबत त्वरीत कार्यवाही करण्याचेही निर्देश सभापती तारा (लक्ष्मी) यादव यांनी दिले.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मनपातर्फे १६०० घरकुलांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी संबंधित अधिका-यांमार्फत देण्यात आली. याबाबत लोकांमध्ये योग्य जनजागृती करून पुरेपुर माहिती देउन जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळवून देण्याचेही निर्देश सभापतींनी दिले. पट्टे वाटपासंदर्भातही दिरंगाई न करता त्रुट्यांची पूर्तता करुन लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करण्याचे त्यांनी निर्देशित केले.

रमाई घरकुल आणि पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात येत्या काही दिवसांमध्ये समिती सदस्य, झोन सभापती, नगरसेवक, संबंधित अधिकारी, कंत्राटदार यांच्या सोबतीने झोन निहाय दौरा करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीत अनुपस्थित झोनचे एनजीओंना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचेही निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती तारा (लक्ष्मी) यादव यांनी दिले.