Published On : Mon, Nov 25th, 2019

अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचा केंद्रीय चमूकडून आढावा

सोयाबीन, धान, कापूस व संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

नागपूर‍ : अतिवृष्टीमुळे विभागातील सोयाबीन, धान, कापूस व संत्रा या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकासान झाले असून नुकसानी संदर्भातील प्रत्यक्ष पाहणी करुन केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी आज नागपूर विभागातील प्रत्यक्ष झालेल्या पिकांच्या नुकसानींची माहिती घेतली.

विभागातील ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीसंदर्भात पाहणी करण्यासाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कापूस विकास संचालक आर.पी. सिंग यांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी कमलकिशोर फुटाणे, महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग, कृषी सहसंचालक रविंद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे आदी यावेळी उपस्थित होते.

पिकांच्या नुकसानीसंदर्भात विभागातील जिल्हा निहाय झालेल्या पीकहानीसंदर्भात सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. विभागात सरासरी 8 लाख 19 हजार 059 हेक्टर क्षेत्रात भाताची पेरणी झाली होती. त्यापैकी ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे 33 टक्केपेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रामध्ये विभागातील 70 हजार 449.15 हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनमध्ये विभागात 44 हजार 024.83 हेक्टर क्षेत्रात, कापूस पिकाच्या 65 हजार 197.79 हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. त्यासोबतच नागपूर जिल्हयातील संत्रा या फळ पिकांतर्गत 7 हजार 342.62 हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी केंद्रीय पथक आपला अहवाल सादर करणार आहे.

विभागात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचे सांगताना डॉ. संजीव कुमार म्हणाले की, विभागात 105.08 टक्के पावसाची नोंद झाली आहे. जून ते ऑक्टोबर या महिन्यात 83 दिवस पाऊस पडला असून विभागात सरासरी 103.59 टक्के पावसाची नोंद झाली आहे. नागपूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात 7 दिवसात 54.21 म्हणजे 110.95 टक्के तर चंद्रपूर जिल्ह्यात 6 दिवसात 61.58 म्हणजेच 118.4 टक्के पावसाची नोंद झाली आहे. विभागात सरासरी 53.52 च्या ऐवजी 90.12 टक्के एवढा 5 दिवसात पाऊस पडला आहे. नागपूर जिल्ह्यातील 14 पैकी 13 तालुक्यात, चंद्रपूर जिल्ह्यातील 15 पैकी 10 तालुक्यात, वर्धा जिल्ह्यात 8 पैकी 6 तालुक्यात, गडचिरोली जिल्ह्यातील 12 पैकी 6, भंडारा जिल्ह्यातील 7 पैकी 4 तालुक्यात तर गोंदिया जिल्ह्यातील 8 पैकी 2 तालुक्यात मोठ्या प्रमाणात सतत अवकाळी पाऊस पडला आहे.

या अवकाळी पावसामुळे संत्र्याचा बहार गळून पडला असून या फळांच्या गुणवत्तेची सुध्दा मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. कपाशीच्या पिकांच्या पात्या व बोंड्या मोठ्या प्रमाणात गळाल्या असून कपाशींच्या फुलांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाल्यामुळे त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. सोयाबीन शेतातच काढून ठेवल्यामुळे शेगांना अंकूर फुटले असून सोयाबीनच्या प्रत्यक्ष नुकसानीसंदर्भात छायाचित्र या पथकाला सादर करण्यात आले.

प्रारंभी कृषी सहसंचालक रविंद्र भोसले यांनी स्वागत करुन विभागातील पीक नुकसानीची माहिती दिली. केंद्रीय चमू पीक नुकसानीसंदर्भात पाहणी करण्यासाठी आज चंद्रपूरसाठी रवाना झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पीक नुकसानींची प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी केल्यानंतर नागपूर जिल्ह्याचा दौरासुद्धा करणार आहे.