नागपूर :महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने ओला, उबर, रॅपिडोसह एग्रीगेटर टॅक्सी सेवांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमांनुसार राइड पूलिंग सेवेचा लाभ केवळ केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण केलेल्या प्रवाशांनाच मिळणार आहे.
नव्या धोरणातील सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे महिला प्रवाशांना राइड पूलिंगदरम्यान केवळ महिला सहप्रवाशांसोबतच प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेत मोठी भर पडणार असल्याचे मानले जात आहे.
तसेच, राइडदरम्यान ठरलेल्या मार्गात विनाकारण बदल करता येणार नाही. मार्ग बदलण्याची आवश्यकता असल्यास त्याची पूर्वकल्पना सर्व प्रवाशांना देणे आणि सर्वप्रथम राइड बुक केलेल्या प्रवाशाची संमती घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
याशिवाय, चालक वेळेत न पोहोचल्यास किंवा प्रवाशांनी विनाकारण राइड रद्द केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूदही करण्यात आली आहे. नव्या नियमांमुळे प्रवास अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





