Published On : Mon, Oct 12th, 2020

महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा

राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत , मात्र महाआघाडी सरकार ढिम्म बसून आहे. अशा असंवेदनशील सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर आंदोलन केले जात आहे. राज्यातील महिला सुरक्षित बनेपर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महाआघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाहीत, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी दिला. महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या विरोधात भाजपातर्फे आयोजित राज्यव्यापी निषेध कार्यक्रमात पुणे येथे सहभागी होताना मा. पाटील यांनी हा इशारा दिला.

भारतीय जनता पार्टीतर्फे सोमवारी राज्यभर महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष उमाताई खापरे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ . देवयानी फरांदे, चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते गिरीश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, आशीष शेलार, मुंबई अध्यक्ष आ.मंगलप्रभात लोढा तसेच पक्षाचे प्रदेश स्तरावरील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.

मा. पाटील म्हणाले की , महाआघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिलांवर अत्याचाराची मालिकाच सुरु आहे. अल्पवयीन मुली , बालिकांवरही निर्घृण अत्याचार होत आहेत. मात्र एवढे अत्याचार होऊनही राज्य सरकार या अत्याचाराच्या घटनांना रोखण्यासाठी काहीच हालचाल करत नाही. म्हणूनच या सरकारला जागं करण्यासाठी भाजपा ने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यकर्ते महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना रोखण्यासाठी कडक उपाय योजेपर्यंत भाजपा कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत.


महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे म्हणाल्या की बालिका , अल्पवयीन मुली यांच्यावर अत्याचार करून त्यांच्या हत्या करण्याच्या घटना राजरोस घडत असताना राज्यकर्ते मात्र स्वस्थ बसून आहेत. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरलेला नाही. कोविड वरील उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात महिलांवर अत्याचार , विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना रोखण्यास अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी हे आंदोलन आहे.

मुंबई येथे शिवाजी पार्क ते चैत्यभूमी असा मार्च काढून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला.